Anant Ambani : अनंत अंबानींची मोठी मदत, दुर्मिळ आजाराने ग्रस्त असणाऱ्या वेदांशसाठी देणार ९ कोटी

Published : Oct 02, 2026, 03:51 PM IST
Anant Ambani : अनंत अंबानींची मोठी मदत, दुर्मिळ आजाराने ग्रस्त असणाऱ्या वेदांशसाठी देणार ९ कोटी

सार

दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या २३ महिन्यांच्या वेदांश सिंगच्या उपचारासाठी आता एक मोठा आशेचा किरण दिसला आहे. वेदांशच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी अनंत अंबानी यांनी दाखवली आहे.

मुंबई : २३ महिन्यांचा वेदांश सिंग एका दुर्मिळ आजाराशी झुंज देतोय. त्याच्या उपचारासाठी सुरू असलेल्या क्राउडफंडिंग मोहिमेला आता मोठं बळ मिळालं आहे. वेदांशला स्पायनल मस्क्युलर अट्रोफी (SMA) टाईप १ हा आजार आहे. अनंत अंबानी आता त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार आहेत, अशी माहिती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मयुरेश गुजर याने दिली आहे. वेदांशच्या उपचारासाठी तब्बल ९ कोटी रुपयांची गरज आहे. मुंबईचा २६ वर्षीय मयुरेश गुजर आणि त्याची टीम ही रक्कम उभी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मोहीम राबवत होती. लोकांनी दिलेल्या मदतीतून आतापर्यंत सुमारे २.२२ कोटी रुपये जमा झाले होते.

लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी अचानक भेट

मयुरेश आणि त्याची टीम २१ सप्टेंबर रोजी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. तिथेच या मोहिमेला एक अनपेक्षित वळण मिळालं, असं मयुरेशने एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. अनंत अंबानी यांनी मयुरेशच्या टीमच्या हातातील बॅनर्स पाहिले. त्यांनी लगेच आपली गाडी थांबवली आणि सुमारे पाच मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. अनंत अंबानी यांना यावेळी वेदांशची प्रकृती आणि उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची सविस्तर माहिती देण्यात आली.

'उपचाराचा संपूर्ण खर्च मी बघतो'

अनंत अंबानी यांनी वेदांशच्या उपचारासाठी कितीही खर्च आला तरी तो आपण करू, असं आश्वासन दिलं आहे, असं मयुरेश गुजरने सांगितलं. त्यांनी वेदांशला आपल्या रुग्णालयात घेऊन येण्यासही सांगितलं आहे. दोघांनी यावेळी एकमेकांचे मोबाईल नंबरही शेअर केले. मयुरेशने याबद्दलचा व्हिडिओ शेअर करताना "हमारा मिशन सक्सेसफुल रहा" असं म्हटलं आहे. बाळाच्या उपचारासाठी गेल्या अनेक आठवड्यांपासून निधी गोळा करणाऱ्या या टीमसाठी ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे.

'आम्ही आनंदाने थरथर कापत होतो'

मयुरेशने अनंत अंबानींकडून मदतीचं आश्वासन मिळाल्याच्या क्षणाची आठवण सांगताना आपल्या टीमचा आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, "प्रत्येक जागलेली रात्र, प्रत्येक थकवणारा दिवस, पाऊस, ऊन—सगळ्याचं अचानक चीज झाल्यासारखं वाटलं. आम्ही अक्षरशः आनंदाने थरथर कापत होतो."

टीमलाई अधिकृत दुजोऱ्याची प्रतीक्षा

मयुरेश गुजरने स्पष्ट केलं की, अनंत अंबानी यांच्या टीमकडून अधिकृत दुजोरा मिळणं अद्याप बाकी आहे. लवकरच त्यांच्याशी संपर्क होईल आणि पुढची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. वेदांश आता २३ महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे उपचाराच्या दृष्टीने प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा आहे, असंही मयुरेश म्हणाला.

'काहीही अशक्य नाही'

मयुरेश गुजरने सांगितलं की, वेदांशसाठी राबवलेल्या या मोहिमेने आपल्यात एक नवी आशा निर्माण केली आहे. "या मोहिमेने मला एक गोष्ट शिकवली: जगात काहीही अशक्य नाही," असं तो म्हणाला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Captain Smit Machchhar : कॅप्टन स्मित मच्छरांना मुंबईत सलाम, फ्लायदुबई विमान अपघातापासून वाचवलं
Anant Ambani : अनंत अंबानी आता 'प्रोफेसर' झाले, पण ते न्यूकॅसल युनिव्हर्सिटीत नेमकं काय शिकवणार?