
मुंबई : अनंत अंबानी आता न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस इन सस्टेनेबिलिटी' बनले आहेत. पण या पदाचा अर्थ आपण विचार करतो तसा नाहीये. हे काही नेहमीसारखं अकॅडमिक प्रोफेसरचं पद नाही. इंडस्ट्रीमधला प्रॅक्टिकल अनुभव युनिव्हर्सिटीच्या मुलांपर्यंत पोहोचावा, यासाठी हे पद दिलं जातं. वन्यजीव संवर्धन, प्राण्यांचं संरक्षण आणि क्लीन-एनर्जी क्षेत्रात अंबानींनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान दिल्याचं युनिव्हर्सिटीने स्पष्ट केलं आहे.
ज्या लोकांकडे पारंपारिक शिक्षणाव्यतिरिक्त बाहेरच्या जगातला मोठा अनुभव आहे, अशा लोकांना युनिव्हर्सिटीशी जोडण्यासाठी 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' हे पद दिलं जातं. अनंत अंबानींच्या बाबतीत सांगायचं तर, गुजरातच्या जामनगरमधील त्यांचा 'वनतारा' हा वन्यजीव बचाव प्रकल्प आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून त्यांचं काम पाहून न्यूकॅसल युनिव्हर्सिटीने त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
युनिव्हर्सिटीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, या पदामुळे अंबानींना कोणतीही अकॅडमिक डिग्री मिळत नाही किंवा ते युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रमही ठरवणार नाहीत. त्याऐवजी, पर्यावरण संवर्धन आणि एनर्जी ट्रान्झिशनमधला त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांच्या कामी यावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या नव्या भूमिकेबद्दल बोलताना अंबानी म्हणाले की, विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावणं गरजेचं आहे. या कार्यक्रमापूर्वी ते म्हणाले, "इथून पदवी घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जग बदलण्याची ताकद आहे. ज्या न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या पायऱ्यांवर महान मार्टिन ल्यूथर किंग उभे होते, तिथे उपस्थित राहणं हा माझा मोठा सन्मान आहे."
अंबानींच्या प्रोफेशनल कामामुळे युनिव्हर्सिटीला सस्टेनेबिलिटी एज्युकेशनमध्ये मोठा फायदा होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी सोलर मॅन्युफॅक्चरिंग, ग्रीन हायड्रोजन, कार्बन कॅप्चर, क्लीन फ्युएल्स आणि नेक्स्ट-जनरेशन एनर्जी टेक्नॉलॉजी अशा अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. २०३५ पर्यंत रिलायन्सला 'नेट कार्बन झिरो' कंपनी बनवण्याचं जे ध्येय आहे, त्याचाच हा एक भाग असल्याचं न्यूकॅसल युनिव्हर्सिटीने म्हटलं आहे.
त्यांचं वन्यजीव संवर्धनाचं काम हा या नियुक्तीचा दुसरा मोठा भाग आहे. न्यूकॅसलने 'वनतारा'चं वर्णन ३,५०० एकरांवर पसरलेला वन्यजीव बचाव प्रकल्प असं केलं आहे. इथे जखमी आणि दुर्मिळ प्राण्यांना वाचवून त्यांच्यावर उपचार केले जातात. हे काम युनिव्हर्सिटीच्या संवर्धन आणि जैवविविधतेच्या रिसर्चशी मिळतं-जुळतं असल्याचं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे.
या अधिकृत कार्यक्रमात अंबानी म्हणाले, "आज मानवजात अनेक जागतिक आव्हानांचा सामना करत आहे. अशा वेळी पर्यावरण संवर्धन आणि सस्टेनेबिलिटी ही पुढची मोठी चळवळ बनली पाहिजे, जी देश, पिढ्या आणि सर्व भेदभावांच्या पलीकडे असेल."
अंबानींच्या फॅमिली बिझनेस बॅकग्राउंडमुळे या नियुक्तीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. कॉर्पोरेट पॉवर, पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील संबंधांवरून काही अभ्यासक आणि पर्यावरणवाद्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. टीकाकारांनी युनिव्हर्सिटीच्या या निर्णयावर उघडपणे आक्षेप घेतलाय. पण न्यूकॅसलने मात्र अंबानींच्या वन्यजीव संवर्धन आणि क्लीन-एनर्जीमधील कामाचा दाखला देत आपल्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
न्यूकॅसलचे कुलगुरू प्रोफेसर ख्रिस डे म्हणाले, "प्रोफेसर अंबानी अगदी याच प्रकारचं नेतृत्व दाखवत आहेत. भविष्यातील पिढ्यांसाठी एक निरोगी आणि मजबूत इकोसिस्टम तयार करण्यासाठी ते महत्त्वाचे उपाय पुढे नेत आहेत."
३० सप्टेंबर रोजी किंग्ज हॉलमध्ये झालेल्या या अधिकृत कार्यक्रमाने या पदाचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे. हे कोणतंही पारंपारिक अकॅडमिक पद नाही, तर बिझनेस, पर्यावरण संवर्धन आणि एनर्जी ट्रान्झिशनमधला अंबानींचा अनुभव न्यूकॅसलच्या रिसर्च आणि शिक्षणाशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे.