
मुंबई : आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मोठ्या अपघाताचा धोका टळला. पहाटेच्या सुमारास, टेकऑफपूर्वीच एका मालवाहू ट्रकने अकासा एअरलाइन्सच्या QP1410 या विमानाला घासला आहे. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले असून, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्थेतून त्यांना दिल्लीला पाठवण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु विमान आणि ट्रक दोघांचेही नुकसान झाले आहे.
ही घटना पहाटे ४:५४ वाजता घडली. अकासा एअरलाइन्सचे हे विमान बेंगळुरूवरून मुंबईला आले होते आणि ते बे A-7 वर पार्क केले होते. काही वेळानंतर हेच विमान दिल्लीकडे रवाना होणार होते. विमानातून माल उतरवण्याचे काम सुरू असताना, 'बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस'चा एक मालवाहू ट्रक विमानावर आदळला. हा ट्रक विमानातील उजव्या पंखाला धडकला, ज्यामुळे विमान आणि ट्रक दोघांचेही मोठे नुकसान झाले.
धडकेनंतर विमानाची तात्काळ तपासणी करण्यात आली. यात हे विमान उड्डाणासाठी योग्य नसल्याचे आढळले आणि ते तांत्रिकदृष्ट्या एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड (AOG) घोषित करण्यात आले. त्यानंतर, अकासा एअरलाइन्सने तातडीने VT-VBB हे दुसरे विमान उपलब्ध करून दिले. या विमानातून सर्व प्रवाशांना दिल्लीला पाठवण्यात आले.
या घटनेनंतर अकासा एअरलाइन्सने एक निवेदन जारी केले, ज्यात कोणालाही इजा झाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्याच महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक विमान कोसळले होते, ज्यात २४१ विमान प्रवाशांसह २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाच्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान कोसळल्याने संपूर्ण देश हळहळला होता. आजचा अपघात टळला असला तरी, विमान प्रवासाच्या सुरक्षेबद्दलची चिंता मात्र वाढली आहे.