
Actress Daisy Shah lashed out election party workers : मुंबईतील वांद्रे (पूर्व) परिसरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका घराला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने तीव्र संताप व्यक्त केला असून, ही आग मानवनिर्मित निष्काळजीपणामुळे लागल्याचा आरोप तिने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग रात्रीच्या वेळी लागली. त्यावेळी डेझी शाह आपल्या घराबाहेर कुत्र्यांना फिरवण्यासाठी बाहेर आली होती. याच काळात परिसरात निवडणुकीचा प्रचार सुरू होता आणि मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात होते. या फटाक्यांच्या ठिणगीमुळे एका घराला आग लागल्याचे समोर आले आहे.
डेझीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत संबंधित प्रचारकांवर ताशेरे ओढले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की:
"माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही! पण जेव्हा तुम्ही प्रचारासाठी टीम्स कामावर लावता, तेव्हा त्यांच्याकडे किमान 'कॉमन सेन्स' आहे का, याची खात्री करून घ्या. सुदैवाने, आमच्या बिल्डिंग कमिटीने त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी नाकारली होती. इमारतींच्या शेजारी फटाके फोडणे ही प्रचाराची पद्धत असू शकत नाही."
तिने पुढे संताप व्यक्त करताना म्हटले की, "जेव्हा लोकांमध्ये नागरी भान नसते, तेव्हा असे प्रकार घडतात. ही कोणतीही नैसर्गिक आपत्ती नाही, तर ही आग बुद्धीशून्य लोकांमुळे लागली आहे. आता याची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे."
डेझी शाहने आवर्जून नमूद केले की, तिच्या इमारतीच्या समितीने आधीच या प्रचारकांना आत येण्यास मनाई केली होती, जो निर्णय आता तिला पूर्णपणे योग्य वाटत आहे. निवासी इमारतींजवळ फटाके फोडणे हे अत्यंत धोकादायक असून यामुळे लोकांचा जीव धोक्यात येत असल्याचे तिने सांगितले.
या घटनेमुळे निवडणुकीच्या काळात होणाऱ्या अतिउत्साही आणि निष्काळजी प्रचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.