Mumbai Local News : पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा मेगाब्लॉक; 215 लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांना मोठा फटका

Published : Jan 06, 2026, 12:53 PM IST
Mumbai Local News

सार

Mumbai Local News : पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेतल्याने 215 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. कांदिवली-बोरिवली सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे हा ब्लॉक असून AC लोकलसह अनेक जलद गाड्यांवर परिणाम होणार आहे. 

Mumbai Local News : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, यामुळे लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहेत. अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असून काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी या कालावधीत प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मेगाब्लॉकचे कारण काय?

कांदिवली ते बोरिवली स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही मार्गिका विद्यमान जलद मार्गाला जोडण्यासाठी तसेच आवश्यक तांत्रिक-यांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. या कालावधीत अप व डाऊन जलद मार्गांवर तसेच पाचव्या मार्गिकेवर ही वाहतूक बंद राहणार आहे. कामाला वेग देण्यासाठी हा तांत्रिक मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

ब्लॉकची वेळ आणि रद्द होणाऱ्या फेऱ्या

हा मेगाब्लॉक प्रामुख्याने मध्यरात्री असला तरी त्याचा थेट परिणाम पहाटेच्या व सकाळच्या लोकल फेऱ्यांवर होणार आहे.

अप जलद मार्ग : मंगळवारी रात्री 12:00 ते बुधवारी पहाटे 5:30

डाऊन जलद मार्ग : मंगळवारी रात्री 1:00 ते पहाटे 4:30

या काळात मंगळवारी 93 आणि बुधवारी 122 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, एकूण 215 फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.

AC लोकल आणि 15 डब्यांच्या गाड्यांनाही फटका

रद्द होणाऱ्या फेऱ्यांमध्ये AC लोकल तसेच 15 डब्यांच्या जलद गाड्यांचाही समावेश आहे. याशिवाय पाचव्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने नियमित वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका दररोज प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांना बसणार आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी दिलासा

लोकल प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. वाढती गर्दी आणि वेटिंग लिस्ट लक्षात घेता 31 जानेवारी 2026 पर्यंत काही महत्त्वाच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत.

तेजस राजधानी (Mumbai Central–New Delhi) : एक अतिरिक्त 3AC डबा, आता 22 डबे

स्वर्ण जयंती राजधानी (Sabarmati–New Delhi) : एक अतिरिक्त 3AC डबा, आता 23 डबे

Mumbai–Ahmedabad Shatabdi Express : अतिरिक्त डबे जोडले

PREV
Read more Articles on

Recommended Stories

भाजप म्हणतंय '50 खोके एकदम ओके', एकनाथ शिंदेंची मात्र चक्रावून टाकणारी प्रतिक्रिया!
सरकार मुंबईचे अदानीकरण करतेय, फडणवीस केवळ नामधारी नेते, राज ठाकरेंचा कडक शब्दांत मारा!