
मुंबई — मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये ३ ऑगस्ट रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सकाळपासूनच आकाश ढगाळ असून काही भागांत रिमझिम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, काही वेळाने पावसाच्या सरी सुरू पडण्याची शक्यता आहे. तापमान सुमारे २६ अंश सेल्सियस ते ३२ अंश सेल्सियस दरम्यान राहील, असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. या पावसामुळे शहरात थोडा गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने सांगितले की, या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर वेगाने वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. ठाण्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाडा या भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि विदर्भ भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.
विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं नागरिकांनी उघड्यावर थांबू नये, तसेच मोठ्या झाडांखाली, इलेक्ट्रिक पोलच्या खाली थांबण्याचे टाळावे. घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट बरोबर ठेवावा आणि वाहन चालवताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, पावसाचा जोर फारसा नसल्यानं सध्या शाळा, कॉलेजेस किंवा कार्यालयीन कामकाजावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र हवामानात सातत्याने बदल होत असल्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.