
मुंबई : सोशल मीडियाच्या जगतातून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. 'रेड सॉइल स्टोरीज' या लोकप्रिय युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, स्थानिक जीवनशैली आणि निसर्गाच्या कुशीतलं जीवन जगासमोर मांडणारा युट्यूबर शिरीष गवस यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या अकाली जाण्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नव्या प्रकारचं ग्रामीण जीवन लोकांपर्यंत पोहोचवणारा आवाज कायमचा थांबला आहे. वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
शिरीष याला काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झालं होतं. गोव्यातील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यातून त्याला जीवदान मिळू शकले नाही. त्यांचं निधन झाल्याची माहिती प्रसिद्ध युट्यूबर आणि त्यांची जवळची सखी अंकिता वालावलकर (कोकण हार्टेड गर्ल) हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली. वर्षभरापूर्वीच शिरीष आणि त्याची पत्नी पूजा यांना कन्यारत्न प्राप्त झालं. त्याच्या निधनाने कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सोशल मीडियावरील चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरीष गवस याच्यावर दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाट्ये पुनर्वसन या त्याच्या गावात, आज सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक स्थानिक ग्रामस्थ, सोशल मीडिया फॉलोअर्स, तसेच नातेवाईकांनी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांना शेवटचा निरोप दिला.
कोरोना काळात, जेव्हा देशभरातील लोक मोठ्या प्रमाणात शहरांमधून मूळ गावांकडे परतले होते, तेव्हा शिरीष आणि पूजा गवस यांनीही मुंबई सोडून कोकणात कायमचं स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. शहरी आरामशीर जीवनशैली आणि कॉर्पोरेट करिअरच्या विरोधात त्यांनी गावाकडचं साधं आणि सच्चं जीवन स्वीकारलं. शिरीष मुंबईत एका नामांकित कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता, तर पूजा ही JJ School of Art मधून शिक्षण घेतलेली आणि नंतर FTII पुणे मधून प्रॉडक्शन डिझाईन शिकलेली कुशल फाइन आर्टिस्ट होती. तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये सात वर्षांहून अधिक काळ आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं.
कोकणात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेलं 'रेड सॉइल स्टोरीज' हे युट्यूब चॅनेल काहीच महिन्यांत लोकप्रिय झालं. सुरुवातीला त्यांनी पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थांच्या रेसिपीज शेअर करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी गावातील सण-उत्सव, शेती, जंगलातील फळं-फुलं, गावकुसातलं जीवन, स्थानिक लोककला, आणि कोकणातील समृद्ध संस्कृती यावर आधारित व्हिडीओ तयार करून अपलोड करायला सुरुवात केली.
त्यांच्या व्हिडीओंमध्ये केवळ माहिती नव्हती, तर एक जिवंतपणा होता. कधी ते स्वतः शेती करताना दिसायचे, कधी भात लावताना, तर कधी खाटावर बसून गावातल्या आजी-आजोबांच्या आठवणी सांगताना. त्यांनी उकडीचे मोदक, सोलकढी, तांदळाची भाकरी, आंब्याची डाळ अशा पारंपरिक चविष्ट पदार्थांचे व्हिडीओ केले, तसेच शेतीचं महत्त्व, सेंद्रिय उत्पादन, पारंपरिक पद्धतीने अन्न तयार करण्याची प्रक्रिया दाखवली.
त्यांच्या या मेहनती आणि सर्जनशील प्रयत्नांमुळे 'रेड सॉइल स्टोरीज' चॅनेल अवघ्या काही महिन्यांत 40 हून अधिक देशांमध्ये पोहोचले, आणि लाखो प्रेक्षकांनी त्यांना पसंती दिली.
शिरीष आणि पूजा यांनी आपल्या कृतीतून एक महत्त्वाचा संदेश दिला, "स्वतःच्या मुळांशी नाळ जोडली, तर आयुष्य समृद्ध होतं." त्यांनी केवळ करिअरच्या पलीकडे पाहिलं नाही, तर आपलं आयुष्य मातीत रंगलं. आधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गावाकडचं जगणंही जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं.
त्यांच्या व्हिडीओंनी अनेक तरुणांना प्रेरणा दिली, शेतीकडे वळा, आपल्या गावाकडे बघा, पारंपरिक ज्ञान आणि अनुभव सांभाळा आणि त्याला नव्या युगाशी जोडून सादर करा. अनेक तरुणांनी त्यांच्या व्हिडीओंमुळे आपल्या मूळ गावाकडे परतण्याचा विचार सुरू केला आहे.
शिरीष गवस याचा मृत्यू केवळ एका युट्यूबरचा अंत नाही, तर एक सर्जनशील ग्रामीण दूत हरपल्यासारखा आहे. त्याने जे जीवन जगलं, ते एका युगाचं प्रतीक होतं, मातीशी, मूळांशी, संस्कृतीशी आणि खऱ्या आनंदाशी जोडलेलं. सोशल मीडियावर आज जरी हजारो चॅनेल्स असली, तरी शिरीष आणि पूजाचं काम त्या सगळ्यांमध्ये वेगळं ठरतं, कारण ते केवळ प्रदर्शन नव्हतं, तर जिवंत अनुभव होता.
शिरीष गवस याच्या जाण्याने सोशल मीडियावर शोकसंदेशांचा ओघ सुरु आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली आहे. "तुमचं काम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील," "तुम्ही कोकण जगासमोर उभं केलं," "तुमच्या चॅनेलमधून गावाकडं पुन्हा जपलं गेलं," असे अनेक भावनिक संदेश उमटले आहेत.
त्याच्या कुटुंबीयांप्रती सर्व स्तरांमधून सहवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. त्याची पत्नी पूजा आणि छोट्या मुलीला या कठीण काळात शक्ती मिळो, हीच सर्वांची प्रार्थना आहे.