
मुंबई - विरार पूर्व भागात एक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये आई-वडील आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. चिमुकलीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली. अजूनही २० ते २५ जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विरार पूर्वच्या रमाबाई अपार्टमेंट या भागामध्ये ही दुर्घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास इमारत पडली आणि त्यानंतर लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारतीचा चौथा मजला कोसळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या इमारतीमध्ये एकूण ३० ते ३५ कुटुंब राहायला होती.
रात्रीची वेळ असल्यामुळे बहुतेक सर्वजण घरांमध्ये होती. इमारतीचा ढिगारा बाजूच्या चाळीवर पडल्याने तेथील नागरिक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यावेळी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना घडल्यानंतर या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्याला सुरुवात करण्यात आली.
अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन दल आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी उपस्थित झाले. त्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. नऊ ते दहा जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं असून अजूनही काही लोक राडारोड्याखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर काही काळानंतर तिचा आणि आई वडिलांचा मृत्यू झाला.