
मुंबई | प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या झोन-III अंतर्गत कस्टम विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ५.७५ किलो सोनं जप्त केलं असून त्याची बाजारमूल्य सुमारे ५.१० कोटी रुपये एवढी आहे. ही माहिती कस्टम विभागाने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे.
अवैध मार्गाने देशात सोनं आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तस्करांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली. दोन्ही प्रकरणांमध्ये सोनं विविध पद्धतीने लपवून आणलं जात होतं. कस्टम अधिकाऱ्यांनी प्रवाशांची कसून झडती घेतली आणि यामध्ये हे सोनं हस्तगत केलं.
सध्या संबंधित व्यक्तींविरुद्ध कस्टम कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था आणि कस्टम विभागाच्या दक्षतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, मुंबई विमानतळावर सोनं तस्करीचे प्रकार सातत्याने उघड होत असून कस्टम विभाग त्यावर कठोर कारवाई करत आहे.