
Maharashtra Election 2026 : राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ग्रामीण भागातील सत्तासंघर्षाला आता अधिकृत सुरुवात झाली आहे.
उमेदवारी अर्ज भरणे: १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
अर्जांची छाननी: २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारी घेण्याची मुदत: २७ जानेवारी (दुपारी ३ वाजेपर्यंत)
चिन्ह वाटप: २७ जानेवारी (दुपारी ३:३० नंतर)
मतदान: ५ फेब्रुवारी (सकाळी ७ ते सायंकाळी ५:३०)
निकाल आणि मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० पासून)
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या निर्णयाचे पालन करून या निवडणुका घेतल्या जात आहेत. यात प्रामुख्याने खालील विभागांचा समावेश आहे.
१. कोकण विभाग: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
२. पुणे विभाग: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
३. छत्रपती संभाजीनगर विभाग: संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर.
या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागतील. एक मत जिल्हा परिषद सदस्यासाठी आणि दुसरे पंचायत समिती सदस्यासाठी असेल. मतदान प्रक्रियेसाठी राज्यात २५,४८२ मतदान केंद्रे उभारली जाणार असून ही संपूर्ण निवडणूक EVM मशीनद्वारे पार पडणार आहे.
प्रशासनाने मतदारांसाठी जय्यत तयारी केली आहे. विशेषतः महिला मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी काही ठिकाणी 'पिंक मतदान केंद्रे' तर काही ठिकाणी 'आदर्श मतदान केंद्रे' असतील, जिथे पिण्याचे पाणी, वीज आणि स्वच्छ शौचालयाची उत्तम व्यवस्था केली जाईल.
ऑफलाईन अर्ज: यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन असेल.
जात वैधता प्रमाणपत्र: राखीव जागेवरून लढणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) अनिवार्य आहे. निवडून आल्यावर ६ महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द केली जाईल.