Maharashtra Municipal Elections : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा प्रचार आज थांबणार; प्रमुख शहरांत राजकीय संघर्ष शिगेला

Published : Jan 13, 2026, 11:25 AM ISTUpdated : Jan 13, 2026, 11:27 AM IST
shivsena

सार

Maharashtra Municipal Elections : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आज संपणार असून सायंकाळी ५:३० वाजता जाहीर प्रचार थांबेल. पुणे, नागपूर आणि मुंबईत प्रमुख नेत्यांचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे.

Maharashtra Municipal Elections : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असून सायंकाळी ५:३० वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे. पुणे, मुंबई, नागपूर, डोंबिवली आणि जळगावसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना विविध शहरांत जोरदार प्रचार, शक्तिप्रदर्शन आणि आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.

पुण्यात प्रचाराची सांगता; प्रमुख नेत्यांचे शक्तिप्रदर्शन

पुणे महानगरपालिकेच्या १६३ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात प्रमुख राजकीय नेत्यांचे दौरे होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यात जाहीर सभा होत असून, भाजपची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात भव्य रोड शोद्वारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सध्या पुण्यात असून त्यांच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यात कडक बंदोबस्त; १२ हजार पोलिस तैनात

पुणे शहरातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी तब्बल १२ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ईव्हीएम आणि मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी १०५६ पीएमपी बस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे मकोका अंतर्गत अटकेत असलेला गजानन मारणे याला उच्च न्यायालयाने मतदानासाठी दोन दिवस पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे, यामुळेही चर्चांना उधाण आले आहे.

नागपुरात भाजपचा बालेकिल्ला राखण्याचा प्रयत्न

नागपुरातही प्रचाराचा जोर वाढला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दुचाकी चालवत रोड शो करणार आहेत. हा रोड शो इतवारी भारत माता चौक ते महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोद्वारे भाजप नागपुरातील आपला बालेकिल्ला कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबईत मतदानासाठी सुट्टी; संवेदनशील केंद्रांवर लक्ष

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई शहर व उपनगरांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष दक्षता पथक स्थापन केले आहे. मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Weather Update : जानेवारीत अवकाळी पावसाची हजेरी; थंडीच्या लाटेला ब्रेक, मकर संक्रांतीला पावसाची शक्यता
मुख्यमंत्री फडणवीसांनी आकडेवारी जाहीर करत राज ठाकरेंच्या अदानींवरील आरोपांना दिले प्रत्युत्तर