
रायगड | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचा साक्षीदार ठरलेला रायगड किल्ला आता केवळ राजकीय-इतिहासापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याच्याशी जोडलेली वैज्ञानिक दूरदृष्टीही समोर येत आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त उत्खनन मोहिमेतून सापडलेले ‘सौम्ययंत्र’ किंवा यंत्रराज हे पुरातन खगोलशास्त्रीय उपकरण याचे ठोस उदाहरण ठरणार आहे.
हे उपकरण म्हणजे 'Astrolabe' – ज्याचा उपयोग प्राचीन काळात आकाशातील तारे, ग्रहांचे निरीक्षण, दिशांचा अचूक वेध घेणे आणि वेळ मोजण्यासाठी केला जात असे. यंत्रराजाच्या सहाय्याने अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांचा अभ्यास सहज शक्य होत असे. रायगडच्या बांधकामात खगोलशास्त्राचा वापर झाला होता, हे या उपकरणाच्या शोधातून अधोरेखित होते.
उत्खननाचे कार्य गेल्या तीन-चार वर्षांपासून विविध टप्प्यांत सुरू असून, रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील भागापासून ते कुशावर्त तलाव, बाजारपेठ व जगदीश्वर मंदिरापर्यंत विविध स्थळांवर वाड्यांचे अवशेष उघडकीस आले आहेत. मात्र, यामध्ये सर्वात लक्षवेधी शोध म्हणजे कुशावर्त तलावाच्या वरील भागातील वाड्याजवळ आढळलेले हे यंत्रराज आहे.
या उपकरणावर कोरलेल्या ‘मुख’ व ‘पूंछ’ अशा अक्षरांमुळे दिशांचा अंदाज बांधण्यास मदत होत होती. यंत्राच्या मध्यभागी कासव किंवा सापासारखे प्राणी अंकित असून, त्यांचे स्थानही खगोलशास्त्रीय विश्लेषणासाठी उपयुक्त मानले जात होते.
हा शोध म्हणजे केवळ एक पुरातत्त्वीय घटना नसून, शिवकालीन स्थापत्यामागची वैद्यानिक दृष्टी, वेळेचे भान आणि गडरचनेतील अचूकता यांचा पुरावा आहे. इतिहास अभ्यासकांसाठी हे यंत्रराज म्हणजे संशोधनाच्या नवीन दिशा उघडणारा एक ‘महत्त्वाचा नकाशा’ ठरू शकतो.