
Weather Update : राज्यात अलीकडे मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना दिसून आल्या. अशातच आता हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रित कुमार यांच्या माहितीनुसार, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातून मान्सूनने १० ऑक्टोबर रोजी अधिकृत एक्झिट घेतल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यभरात तापमानात वाढ होणार असून “ऑक्टोबर हिट” चा अनुभव नागरिकांना येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातून मान्सून मागे सरकल्यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे, त्यामुळे कोकण, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात दमट उकाड्याचे वातावरण राहणार आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या खाडीपासून ते तामिळनाडूपर्यंतच्या किनाऱ्यावर** चार सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. हवामान विभागाच्या मते, हे पुढील काही तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होऊ शकतात. शक्ती चक्रीवादळ खोल समुद्रात सरकलं असलं तरी त्याचे अवशेष आणि परिणाम अजूनही जाणवतात. त्यामुळे बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू किनारपट्टीवर १०० ते १५० मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागानुसार, पुढील ४८ तासांत सायक्लोनिक सर्क्युलेशन आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांसह तेलंगणा, कर्नाटक आणि ईशान्य भारतातील नागालँड, मिझोराम, मणिपूर या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत तामिळनाडू आणि दक्षिण किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशमध्ये आधीच जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही.मात्र दक्षिण भारतात वारे जोराने वाहतील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.१५ ऑक्टोबरपासून देशभरातून पावसाची एक्झिट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा अधिक जाणवेल. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या काळात “ला निनो इफेक्ट” राहिल्याने डिसेंबरपासून थंडी हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.