
मुंबई : पूर्व विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोलीच्या आलापल्ली भागात काही घरांमध्ये पाणी घुसल्याने रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. एका नाल्यात अडकलेल्या एसटीच्या दोन बसेसमधील विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. गोंदियात माजी जिल्हा परिषद सदस्य नाल्याच्या पुरात वाहून गेले.
गडचिरोलीत पावसाचा जोर वाढला
गेल्या २४ तासांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार सुरु आहे. यामुळे प्राणहिता आणि गोदावरी नद्यांना पूर आलाय आणि जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय. मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावचे ग्रामसेवक उमेश धोडरे रात्रीच्या वेळी कारसह नाला पार करताना पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. मात्र, झाडाला लटकून त्यांनी जीव वाचवला आणि स्थानिक तरुणांनी धाव घेऊन त्यांना वाचवलं.
आलापल्लीत नागरिकांचं स्थलांतर, रस्ते बंद
गडचिरोलीच्या आलापल्ली भागात पाण्यामुळे अनेक घरांत शिरकाव झाला आहे. प्रशासनानं तात्काळ ६४ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढून जिल्हा परिषद शाळेत त्यांची राहण्याची व्यवस्था केलीय. सती नदीजवळ पूर आल्याने कुरखेडा-वैरागड आणि इतर मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.
चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट
चंद्रपूरमध्ये विरूर नाल्याला पूर आल्यामुळे चिचबोर्डी आणि सिर्शी गावाजवळ एसटीच्या दोन बसेस अडकल्या होत्या. यामधील सुमारे ६० विद्यार्थी आणि नागरिकांना पोलीस आणि प्रशासनानं सुखरुप बाहेर काढलं. हवामान विभागानं चंद्रपूरसाठी रेड अलर्ट जाहीर केलाय.
विदर्भात पावसाचे थैमान
प्रादेशिक हवामान विभागानं शुक्रवार २५ जुलै आणि शनिवार २६ जुलैसाठी विदर्भात विविध अलर्ट जाहीर केले आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, नागपूर आणि वर्ध्याला ‘ऑरेंज अलर्ट’, तर इतर पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता सुरक्षित स्थळी राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.
भंडाऱ्यात शाळांना सुट्टी
आज शुक्रवार २५ जुलै रोजी भंडारा जिल्ह्याच्या प्रशासनाने मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अधिकृत घोषणांनुसारच पुढील निर्णय घ्यावेत, असं प्रशासनानं कळवलं आहे.