
अहिल्यानगर : शिर्डीचे साईबाबा हे श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे, कोट्यवधी देश-विदेशातील भक्तांचे श्रद्धास्थान मानले जातात. मात्र, स्वतःला तलवार बाबा म्हणवणाऱ्या हिंदू सेनेचे संत युवराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. युवराज यांनी साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे, त्यांना गटारात फेकण्याचे खुले आवाहन केल्याने साईभक्त आणि सामाजिक संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, शिर्डी पोलिस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
साईबाबांवर गंभीर आरोप करत मूर्ती हटवण्याची धमकी
संत युवराज यांनी अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यात त्यांनी म्हटलं की, "काही मंदिरांमध्ये आजही साईबाबांच्या मूर्ती आहेत. गल्लीगल्लीत त्यांची मंदिरे आहेत. या मूर्ती मंदिरांतून हटवा. त्या तोडून गटारात फेका. नदीत टाकू नका, पुन्हा परत मिळतील. जर मूर्ती हटवल्या नाहीत तर आम्ही जबरदस्तीने हटवू. फरिदाबादपासून ही मोहीम सुरू होईल." एवढ्यावरच न थांबता त्यांनी साईबाबांना "मुस्लीम, मासाहारी आणि व्यभिचारी" असे अपशब्द वापरले.
शिर्डीतील संताप; पोलिसांत तक्रार
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर साईभक्त, शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. साईभक्तांनीही युवराज यांच्यावर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
पूर्वीही साईबाबांवर टीका
युवराज यांच्याआधीही उत्तर प्रदेशातील सनातन रक्षक दल आणि अयोध्येच्या हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी साईबाबांवर टीका केली होती. साईबाबा हे धर्मगुरू किंवा पीर असतील, पण ते "ईश्वर" किंवा "देव" नाहीत, असं म्हणत काही ठिकाणी त्यांच्या मूर्ती मंदिरांतून हटवण्यात आल्या होत्या.
साईबाबांवर टीका
साईबाबांचा "सबका मालिक एक" आणि "श्रद्धा-सबुरी" हाच खरा संदेश आहे. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करून समाजात धार्मिक तेढ आणि अस्थिरता निर्माण केली जात असल्याचा आरोप साईभक्तांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संत युवराज यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचं साईभक्त, सामाजिक संघटना आणि नागरिक यांचं म्हणणं आहे.शिर्डी आणि इतरत्र प्रशासनावर दबाव वाढत असून, कायद्यानुसार योग्य ती पावले उचलली जातील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.