
मुंबई : राज्यात मराठी विरुद्ध हिंदी भाषेच्या वादाला उधाण आले असतानाच, भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठी समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड यांनी संसद भवनाच्या लॉबीमध्ये दुबे यांना जाब विचारला. मात्र, हा वाद याच्यावरच न थांबता, लोकसभेत दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, गायकवाडांचा हस्तक्षेप
ऑपरेशन सिंदूर या विषयावर लोकसभेत चर्चा सुरू असताना निशिकांत दुबे भाषण देत होते. यावेळी वर्षा गायकवाड सतत बोलत होत्या, त्यामुळे दुबे नाराज झाले. “अशा पद्धतीने समोरून रनिंग कॉमेंट्री सुरू राहिली तर संसदेत कामकाज कसे चालेल?”, असा प्रश्न दुबे यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, "या भगिनी पाहा, यांना इतकंही माहिती नाही की संसदेच्या लॉबीमध्ये जे चालते ते हसत-मस्करीत असते. पण या त्याची बातमी करतात. जर आम्हीही यांच्या भाषणात बोलायला सुरुवात केली, तर काँग्रेसचे खासदार एक शब्दही संसदेत बोलू शकणार नाहीत," असे त्यांनी स्पष्टपणे विधान केले.
गायकवाड यांची तीव्र प्रतिक्रिया
दुबे यांच्या विधानांमुळे वर्षा गायकवाड आक्रमक झाल्या आणि त्यांनी पुन्हा एकदा दुबे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. “दुबे यांनी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान केला, म्हणूनच आम्ही त्यांना जाब विचारला,”असे वर्षा गायकवाड यांनी ठामपणे सांगितले. या क्षणी सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पीठासीन अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप
गोंधळ वाढू लागल्यावर, पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी वर्षा गायकवाड यांना शांत राहण्याचे निर्देश देत स्पष्ट शब्दांत सांगितले, "आपण आपल्या जागेवरून टिप्पणी करू नका. मी आपल्याला मध्ये बोलण्याची परवानगी दिलेली नाही. कृपया कामकाजात अडथळा आणू नका."
या वादामुळे मराठी-हिंदी भाषेवरील चर्चेला पुन्हा एकदा राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. निशिकांत दुबे यांच्या विधानांनी नवीन वादळ निर्माण केले असून, मराठी अस्मितेचा मुद्दा संसदेतही गाजताना दिसत आहे. यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.