
Vaishnavi Hagawane Death : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला असून तिच्या वडिलांनी हा खून असल्याचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार तिच्या शरीरावर एकूण 29 जखमा आढळल्या असून त्यातील 15 जखमा मृत्यूपूर्वी 24 तासांत झालेल्या आहेत. त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे, असा ठाम आरोप तिचे वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे यांनी केला आहे.
कसपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शरीरावरील इतर जखमा जुन्या असून त्या तिच्या सातत्याने होणाऱ्या छळाचा आणि मारहाणीचा पुरावा आहेत. त्यांच्या मते, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तपास SIT (विशेष तपास पथक) कडे द्यावा, आणि एक सक्षम वकील नेमावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
प्रेमविवाहाचा विरोध आणि त्यातून झालेले लग्न
वैष्णवीच्या मामा उत्तम बहिरट यांनी सांगितले की, वैष्णवी आणि शशांक यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी प्रेमविवाहाचा निर्णय घेतला होता, मात्र घरच्यांचा याला तीव्र विरोध होता. या वादामुळे वैष्णवीच्या वडिलांची प्रकृती बिघडून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. शशांकने तिला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अखेर समाजात बदनामी होऊ नये म्हणून घरच्यांनी दोघांचे लग्न लावून दिले.
शशांककडून इतर मुलांना धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीच्या घरच्यांनी हगवणे कुटुंबीयांची पार्श्वभूमी तपासून दुसऱ्या स्थळाचा विचार केला होता. यावेळी वैष्णवीला पाहायला आलेल्या दोन मुलांना शशांकने फोन करून धमकावल्याची माहिती समोर आली आहे.
प्रेमविवाह असूनही प्रचंड हुंडा
वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह 28 एप्रिल 2023 रोजी सूसगाव येथे पार पडला होता. घरच्यांच्या विरोधात जाऊन वैष्णवीने हा निर्णय घेतला होता. विवाहात तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी, गौरी मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल, घड्याळे आणि रोख पैसे अशा स्वरूपात भरघोस हुंडा दिला होता. लग्नाचा थाट देखील सन्नीज वर्ल्ड या आलिशान स्थळी झाला होता. मात्र, लग्नाच्या काही दिवसांतच वैष्णवीवर छळ, मारहाण आणि अत्याचार सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्ह्याचा तपास अधिक खोलवर होण्याची गरज
पोस्टमार्टम अहवाल आणि तिच्या वडिलांनी केलेले आरोप हे प्रकरण गंभीर बनवत असून, वैष्णवीच्या मृत्यूमागे नेमके काय कारण होते, हे शोधण्यासाठी सखोल तपास करणे गरजेचे आहे. तिच्या कुटुंबीयांनी न्याय मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.