Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचे कर्नाटकात धागेदोरे, माजी मंत्र्यांच्या मुलासह पाचजण अटकेत

Published : May 27, 2025, 11:27 AM ISTUpdated : May 27, 2025, 11:29 AM IST
Vaishnavi Hagawane Case

सार

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवे खुलासे होताना दिसून येत आहे. अशातच वैष्णवीच्या मृत्यूचे कनेक्शन कर्नाटकातील निघाले आहे. या प्रकरणात माजी मंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे संशयित आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, फरारी आरोपींना मदत केल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील अडचणीत आला आहे. पोलिसांनी प्रीतमसह पाच जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

फरारी आरोपींना मदत करणाऱ्यांवर कारवाई

पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींमध्ये प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, चिकोडी, बेळगाव) यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय ६०), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५), अमोल विजय जाधव (वय ३५) आणि राहुल दशरथ जाधव (वय ४५) यांचा समावेश आहे. या आरोपींनी मुख्य आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना फरारी असताना लपवले, त्यांना राहण्याची व आर्थिक मदत दिल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातील एका 'हेरिटेज रिसॉर्ट'मध्ये राजेंद्र हगवणे यासाठी जे बुकिंग करण्यात आले होते, ते प्रीतम पाटील यांच्या नावावर होते.

राजेंद्र हगवणेच्या पलायनाचा प्रवास उघड

मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे याने गुन्हा घडल्यानंतर तब्बल पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहण्याचा प्रयत्न केला. औंध येथील रुग्णालयात सून वैष्णवीच्या मृत्यूनंतर तो आपल्या मुलाला घेऊन पोहोचला. त्यानंतर त्याचा प्रवास मुळशीच्या 'मुहूर्त लॉन्स'मार्गे वडगाव मावळ, नंतर पवना डॅमजवळील फार्महाऊस, आणि आळंदी येथील लॉजपर्यंत झाला. तो सतत आपले ठिकाण बदलत होता आणि गर्दीपासून दूर राहणाऱ्या परिसरात मुक्काम करत होता.

साताऱ्यातून कोगनोळीपर्यंतचा प्रवास

१८ मे रोजी त्याने कार बदलून पुन्हा वडगाव मावळ भागात प्रवेश केला. त्यानंतर कर्नाटकातील बेळगाव नोंदणीच्या वाहनातून साताऱ्यातील पुसेगाव येथे पोहोचला, जिथे अमोल जाधवच्या शेतावर काही वेळ थांबला. नंतर तो कोगनोळी येथे गेला आणि 'हॉटेल हेरिटेज'मध्ये दोन दिवस मुक्काम केला. या कालावधीत त्याने सतत वाहन आणि मोबाइल नंबर बदलले. यामुळे पोलिसांना त्याचा माग काढण्यात अडचणी आल्या. अखेर २२ मे रोजी पुण्याकडे परतताना पोलिसांनी त्याला अटक केली.

सीसीटीव्ही फुटेज आणि तपास पथक

पोलिसांनी आरोपीच्या पलायनातील प्रत्येक टप्प्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. लॉज, हॉटेल्स आणि फार्महाऊसच्या रेकॉर्डिंगमध्ये महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचे समजते. पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथक तयार केले आहे. लॉजमध्ये नोंद न करता मुक्काम देणारे, वाहन देणारे, आर्थिक मदत करणारे आणि मार्गदर्शन करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता असून, काहींना समन्सही बजावण्यात आले आहेत.या प्रकरणाने वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमागील सत्य उलगडण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू असून, यामध्ये राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही खळबळ निर्माण झाली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!