
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात थेट पुढाकार घेतला आहे. "वैष्णवीसाठी जी लढाई लढावी लागेल, ती मी लढणार," अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "वैष्णवी हगवणे हिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. हे केवळ दुर्दैवी नाही, तर अत्यंत संतापजनक आहे. एका सुसंस्कृत समाजात अशा घटना घडतात ही बाब काळजाला चटका लावणारी आहे."
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, हगवणे कुटुंबातील पुरुष सदस्य गायब झाले आहेत. याकडे लक्ष वेधत सुळे म्हणाल्या, "घरातल्या पुरुष सदस्यांचा अचानक झालेला गैरहजर होणं संशयास्पद आहे. काय लपवायचं आहे, हे प्रशासनाने शोधलं पाहिजे." वैष्णवीचा विवाह शशांक हगवणे याच्याशी प्रेमविवाह होता. ती अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून होती. लग्नात तिच्या वडिलांनी भरघोस हुंडा दिला, तरीही तिचा सासरी छळ होत होता, असं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी ठामपणे सांगितलं, "ही केवळ वैष्णवीची नाही, तर हजारो महिलांची लढाई आहे. मला तिच्या कुटुंबाचा आधार व्हायचं आहे. तिला न्याय मिळवून देणं, हे माझं सामाजिक आणि वैयक्तिक कर्तव्य आहे."