पुणे हादरले! वैष्णवीच्या हत्येची शक्यता, हगवणे कुटुंबावर दोन सुनांच्या छळाचे गंभीर आरोप; राजकीय कनेक्शनची चर्चा!

Published : May 21, 2025, 05:55 PM IST
vaishnavi hagawane

सार

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या धाकट्या सुनेच्या आत्महत्येप्रकरणी नवे खुलासे झाले आहेत. कुटुंबातील छळाचे गंभीर आरोप आणि राजकीय वरदहस्तामुळे हगवणे कुटुंब चर्चेत आले आहे.

पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांची धाकटी सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणी आता नवे आणि गंभीर खुलासे होत आहेत. शवविच्छेदन अहवालात हत्येची शक्यता वर्तवली जात असताना, हगवणे कुटुंबाचे जुने कारनामेही समोर आले आहेत.

कुटुंबातील छळाचे गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीसोबत घडलेला छळाचा प्रकार हा नवीन नाही, तर त्यांच्या मोठ्या सुनेसोबतही असेच घडल्याचे समोर आले आहे. मोठ्या सुनेने नोव्हेंबर २०२४ मध्ये पौड पोलीस स्टेशनमध्ये छळाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी सासरे राजेंद्र हगवणे यांनी तिला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली होती आणि मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे. धाकट्या सुनेच्या मृत्यूने या कुटुंबातील सर्व गैरप्रकार आता चव्हाट्यावर आले आहेत.

राजेंद्र हगवणे आणि मुलाचा शोध सुरू

या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हे फरार आहेत, तर पती, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या घटनेची चर्चा सुरू असून, अजित पवार यांनी कोणतीही ठोस पाऊल उचलले नसल्याने राजकीय पाठबळामुळेच हगवणे यांना पकडले जात नसल्याची चर्चाही रंगली आहे.

वैष्णवीच्या पालकांची न्यायासाठी आर्त हाक

वैष्णवीच्या आई-वडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अजित पवार आणि राजेंद्र हगवणे यांचे अतिशय जवळचे संबंध असल्यामुळेच वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांना अटक होत नाहीये. त्यांनी अजित पवारांना त्यांची "लाडकी बहीण" वैष्णवीला न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. गरज पडल्यास अजित पवारांशी बोलण्याची तयारीही कस्पटे कुटुंबियांनी दर्शवली आहे.

पोलिसांचा तपास आणि पुढील कारवाई

राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष असल्यामुळेच सून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी त्यांना अटक होत नाही, अशा चर्चांना बावधन पोलिसांनी नकार दिला आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, त्यांची तीन पथके हगवणे यांच्या शोधात आहेत. मात्र, पोलिसांनी वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा केला आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला होता, तिला मारहाण करण्यात आली होती आणि तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुनेला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी प्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणे यांच्यासह सासू, पती शशांक, नणंद आणि दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पती शशांक, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली असून, सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरू आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!