
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज पुण्यातील न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत हगवणे कुटुंबातील सर्व पाच आरोपींना हजर करण्यात आलं आणि त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली. मात्र, यावेळी न्यायालयात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आश्चर्यचकित करणारा ठरला. त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचीच प्रवृत्ती आत्महत्येकडे झुकणारी होती, असा गंभीर दावा केला.
कोर्टात युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी सांगितलं की, वैष्णवी एका अनोळखी व्यक्तीसोबत सतत चॅट करत होती आणि ते चॅट पोलिसांच्या हाती लागलं आहे. तिच्या वकिलांचा दावा होता की, “वैष्णवीची मानसिकता आत्महत्येकडे झुकणारी होती.” एवढंच नाही, तर “पतीने पत्नीला कानाखाली मारणं म्हणजे छळ नव्हे,” असा युक्तिवाद करत छळाच्या आरोपांना कमी महत्त्व देण्याचा प्रयत्न केला.
सरकारी वकिलांनी वैष्णवीच्या मृत्यूच्या आधीच्या ३० शारीरिक खुणा न्यायालयात अधोरेखित करत यामध्ये १५ खुणा केवळ मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झाल्याचं सांगितलं. या खुणांचा हेतू, मारहाणीमध्ये वापरलेली साधनं, आणि घटनास्थळी कोण होते, याचा तपास पूर्ण होणं बाकी आहे, असं सांगत आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रकरणात ५१ तोळे सोनं गहाण ठेवण्यात आलेलं असून ते कोणत्या बँकेत आहे, कशासाठी गहाण ठेवलं गेलं याचाही तपास सुरू आहे, असं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं.
वैष्णवीच्या कुटुंबाकडून हगवणे कुटुंबावर फॉर्च्युनर कारची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, आरोपींच्या वकिलांनी या आरोपाचं खंडन करत, “आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या आहेत, आम्ही कार मागण्याचा प्रश्नच येत नाही,” असं म्हणत दावा फेटाळला. मात्र वैष्णवीच्या कुटुंबियांनी कोर्टात ठामपणे सांगितलं की, ही कार त्यांच्या घरच्यांकडूनच मागण्यात आली होती.
१६ मे रोजी वैष्णवी हगवणेनं सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तिचा पती शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, नणंद करिश्मा आणि दीर सुशील या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. यातील काही आरोपी पाच दिवस फरार होते. आता या प्रकरणात फक्त पोलिसी चौकशीच नाही, तर न्यायालयीन संघर्षातही गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
या प्रकरणात वैष्णवीच्या चारित्र्यावर उठवले गेलेले प्रश्न, तिच्या मृत्यूच्या आधीच्या खुणा, आणि कौटुंबिक छळाचे आरोप हे सर्व मिळून प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनतंय. एकीकडे आरोपींची बाजू मांडण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे मृत व्यक्तीच्या न्यायासाठी लढणारे कुटुंब यामध्ये न्यायालयाने कोणाला समजून घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.