
मुंबई: हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, हिंदी भाषेबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच झाला होता आणि त्यासाठी समितीही नेमली गेली होती. मात्र यावर आता शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट आणि धारदार प्रत्युत्तर दिलं आहे. "ती समिती प्राथमिक शिक्षणासाठी नव्हतीच... आणि खोटं कशाला बोलता?"
उद्धव ठाकरे म्हणाले, "माशेलकर समिती ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणासाठी नेमलेली होती. त्या समितीत प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा आला नव्हता. त्यानंतर मंत्रिमंडळात अहवाल आला आणि अभ्यास गट मी स्थापन केला. पण अंतिम शासन निर्णय भाजप सरकारने घेतला. जर मी तो निर्णय घेतला असता, तर तुम्ही तीन वर्ष झोपा काढत होता का?"
“आज संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात आंदोलन झाले. जीआरची होळी झाली. सरकारची सक्ती मराठी शक्तीपुढे हरली. हे सरकार मराठी मते भाजपकडे खेचण्यासाठी खेळी करत आहे, पण ती उघड झाली आहे,” असंही ठाकरे म्हणाले. “भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी. खोट्या बातम्या पसरवणं आणि विरोधकांची बदनामी करणं हाच त्यांचा धंदा आहे. आता या फॅक्टरीवर आधारित एक सिनेमा यावा आणि फडणवीस यांचं पोस्टर लावावं,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
“मराठी माणूस एकवटला म्हणूनच सरकारने घाईत जीआर मागे घेतला. आता ही एकजूट कायम ठेवणं आवश्यक आहे. संकट आल्यावर एकत्र यायचं की आधीच संघटित राहायचं, हे आपल्यावर आहे,” अशी भावनिक साद त्यांनी मराठी जनतेला घातली.