
मुंबई : हिंदीच्या सक्तीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या मराठी जनतेच्या एकतेने अखेर सरकारला झुकवले! राज्य सरकारने दोन्ही वादग्रस्त जीआर रद्द करत त्रिभाषा धोरण थांबवण्याचा निर्णय घेतला असला, तरीही ५ जुलै रोजीचा मोर्चा रद्द होणार नाही, अशी ठाम घोषणा शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. “मोर्चा नाही, तर आता जल्लोष मोर्चा होईल!” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या विजयाची साजरी करण्याची भूमिका मांडली. “कधी, कुठे आणि कसा मोर्चा होईल, हे दोन दिवसांत जाहीर करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “शासनाच्या जीआरची आज राज्यभर ठिकठिकाणी होळी करण्यात आली. मी स्वतः पत्रकार संघासमोरच्या आंदोलनात सहभागी झालो. मराठी माणसांच्या एकतेमुळेच हा निर्णय मागे घेण्यात आला. हीच ताकद संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिसली होती आणि आजही दिसली.”
त्यांनी सरकारवर टीका करत म्हटले, “मराठी माणसांमध्ये फूट पाडण्यासाठीच हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न झाला. पण लोकांनी स्पष्ट भूमिका घेतली. हिंदीला विरोध नाही, पण सक्तीला तीव्र विरोध आहे! सरकारचा मराठी-अमराठी वाद निर्माण करण्याचा डाव जनता ओळखते.”
“राज ठाकरे आणि मनसेशी मराठीच्या मुद्द्यावर आम्ही जुळवून घेतलं. आता प्रश्न असा आहे पुढे एकत्र दिसणार का? त्यावर माझं उत्तर एकच संकट आल्यावर एकत्र येण्यापेक्षा एकत्र आलो, तर संकटच येणार नाही!” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा सहकार्याची साद घातली.
भाजपवर निशाणा साधताना त्यांनी म्हटलं, “भाजप म्हणजे खोट्यांची फॅक्टरी आहे. अफवा पसरवून खोट्या मार्गाने सत्ता मिळवायची ही त्यांची सवय आहे. पण आता मराठी जनतेला जाग आलेली आहे. ही जागरूकता कायम ठेवणं गरजेचं आहे.”
“५ जुलै रोजी मोर्चा किंवा सभा होणारच. ती विजयाची आणि एकतेची असेल,” असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. सर्वच मराठीप्रेमींना यात सामील होण्याचं आवाहन करत त्यांनी स्पष्ट केलं की आंदोलन जिंकलं असलं तरी लढा संपलेला नाही!