UBT Meeting Today : ऑपरेशन टायगर फसलं तर नाही ना? कोण कुणाबरोबर आणि कोण कुणाबरोबर नाही, आज उबाठाची संसदीय दलाची बैठक, चित्र स्पष्ट होणार

Published : Jun 18, 2026, 09:10 AM IST
UBT Meeting Today

सार

UBT Meeting Today : ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे कालच नुकतीच उबाठाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. अशातच आज संसदीय पक्षाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी व्हिप जारी केला आहे.

UBT Meeting Today : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील सहा ते सात खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी सध्या जोर आहे.यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले गेले आहे. याच कारणास्तव उबाठा पक्षाने गुरुवारी (18 जून) संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सदर बैठक दिल्लीतील उबाठाच्या कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीसाठी लोकसभेतील पक्षनेते अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई यांनी सर्व खासदारांना तीन ओळींचा पक्षादेश जारी केला आहे. 

बैठकीला उपस्थित राहणारे खासदार पक्षासोबत असल्याचे मानले जाईल, असे उबाठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा बंडखोर खासदारांना कायद्याचा कचाट्यात अकडवू अशा सूचक इशारा उबाठाकडून देण्यात आला आहे.याशिवाय, उद्धव ठाकरेंसोबत असणारे आज संसदीय बैठकीत दिसतील असे संजय दीना पाटील यांनी म्हटले. तर 6 पैकी 2 खासदारांनी पत्रावर सही केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा अध्यक्षांकडे उबाठाची धाव

दरम्यान, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत पक्षाची भूमिका स्पष्ट करणारे पत्र सादर केले. पक्षातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याची चर्चा आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी संसदीय नियम, संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी विनंती अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी ओम बिर्ला यांना केली. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतरच पुढील कारवाई व्हावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.

संजय राऊतांचे आरोप

उबाठामधील खासदार फुटीच्या प्रकरणावरील चर्चांवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी काही गंभीर आरोप केले. राऊत यांनी म्हटले की, "आमच्या पक्षातील खासदारांना पैशांचे प्रलोभन दाखवण्यात आले आहे. प्रत्येक खासदाराची किंमत किमान ५० कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. त्यांना रात्रीपर्यंत प्रत्येकी १५ कोटी रुपये देण्याची तयारी करण्यात आली होती. पैसे मिळाल्याशिवाय काही खासदार विमानात बसायलाही तयार नव्हते,". मात्र या आरोपांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

राजाभाऊ वाजेंची स्पष्ट भूमिका

शिवसेनेच्या (उबाठा) नऊ खासदारांपैकी किमान सहा खासदारांनी एकत्रितपणे पक्षांतर केल्यास अपात्रतेपासून बचाव होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार असल्याचे म्हटले. "उद्धव ठाकरे यांना सोडून इतर कुणासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिंदे गटातील काही नेते माझ्या सिन्नर येथील निवासस्थानी आले होते, त्यांनाही मी हाच संदेश दिला," असेही वाजे यांनी म्हटले.

बैठकीकडे राज्याचे लक्ष

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार फुटीच्या चर्चांमुळे ठाकरे गटासमोरील आव्हाने वाढली आहेत. गुरुवारी होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीत कोणते खासदार उपस्थित राहतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतरच ठाकरे गटातील नाराजी आणि संभाव्य फुटीबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक