BEST Bus Strike : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 19 जूनपासून बेस्ट बससेवा ठप्प होण्याची शक्यता

Published : Jun 18, 2026, 08:06 AM IST
BEST Bus Strike

सार

BEST Bus Strike : बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने येत्या 19 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. याचा मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

BEST Bus Strike :  मुंबईतील बेस्ट बससेवा (BEST Bus) येत्या 19 जूनपासून ठप्प होण्याची शक्यता आहे. कारण बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने एक पत्रकार परिषद घेऊन व्यवस्थापनाला संपाचा अल्टिमेटम दिला. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास बसचालकांसह वाहतूक आणि वीज विभागातील कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशारा संघटनांनी दिला आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

कामगार संघटनांनी पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. 

  • बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा
  • कंत्राटी चालकांना कायमस्वरूपी सेवेत सामील करत वेतन व इतर सोयीसुविधा द्याव्यात
  • बेस्टच्या ताफ्यात वाढ करण्यासाठी 5 हजार नवीन बस खरेदी कराव्यात
  • निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीने द्यावीत

वेतन मिळण्यास विलंब आणि थकीत रक्कमेवरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न होणे, थकीत रक्कमेची देयके प्रलंबित राहणे आणि कर्मचाऱ्यांच्या काही महत्वाच्या गोष्टींसंबंधित अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांवर तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे संघटनेने म्हटले आहे.

500 कोटींच्या निधीवर संघटनांचे समाधान नाही

मुंबई महापालिकेने नुकताच बेस्ट बससाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र तो अपुरा असल्याचे बेस्ट कर्मचारी सेनेचे सरचिटणीस उदय आंबोणकर यांनी स्पष्ट केले. उदय आंबोणकर यांनी असे म्हटले की, बेस्ट बससाठी मंजूर करण्यात आलेला निधी थकीत देणी भागविण्यासाठी पुरेसा नाही. तसेच भविष्यात वेतन आणि देणी थकबाकीची समस्या पुन्हा निर्माण होणार नाही, यासाठी निश्चित कालावधीत पूर्णपणे तोडगा काढणे महत्वाचे आहे.

तोडगा न निघाल्यास मुंबईच्या वाहतुकीवर मोठा परिणाम

संपाची मुदत 19 जूनपर्यंत देण्यात आली आहे. यामुळे बस व्यवस्थापन आणि महापालिका प्रशासनाकडे तोडगा काढण्यासाठी अवघा कमी कालावधी शिल्लक आहे. कोणताही निर्णय न झाल्यास आधीच आर्थिक संकट आणि जुन्या बस ताफ्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या बेस्टच्या सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, बेस्ट प्रशासनाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक