
मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय अखेर रद्द केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली. मात्र यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक सूचक आणि लढाऊ सूर असलेलं ट्विट करत भाजप सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "विजय मराठी माणसाचा, विजय मराठी भाषेचा! मराठी माणूस एकवटताना दिसताच भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. ही तर फक्त सुरुवात आहे. एकीचं बळ महाराष्ट्र पाहणार आहे!" या ट्वीटमधून त्यांनी सूचित केलं की मराठी अस्मितेच्या लढ्याची ही सुरुवात आहे आणि पुढील काळात ही एकजूट आणखी प्रभावी रूप धारण करणार आहे.
याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली आहे. जीआरची होळी झाली, मराठी माणूस रस्त्यावर उतरला आणि सरकार झुकलं. आज सरकारने पाऊल मागे घेतलं हे मराठी जनतेच्या एकतेमुळे शक्य झालं.” त्यांनी स्पष्ट केलं की या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही भाषेचा विरोध नव्हता, तर सरकारने घेतलेल्या सक्तीच्या विरोधात होता. "भाषेला विरोध नाही, पण जबरदस्तीला विरोध आहे," असं ते म्हणाले.
ठाकरे यांनी भाजपवर मराठी-अमराठी वाद निर्माण करून निवडणुकीपूर्वी सामाजिक ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करताना म्हटलं, "५ तारखेचा मोर्चा होऊ नये म्हणूनच त्यांनी घाईघाईने जीआर मागे घेतला. पण मराठी माणसाची एकजूट पाहूनच सरकारनं माघार घेतली. ही लढाई इथे थांबणार नाही."