नागपुरात उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाचा हुंकार; राम मंदिरात पूजा, कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

Published : Jul 18, 2026, 11:35 AM IST
uddhav Thackeray

सार

शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आज शनिवारी नागपुरात राम रक्षा आंदोलन करणार आहेत. याशिवाय तेथील राम मंदिरात पूजा-प्रार्थनाही केली जाणार आहे. या आंदोलनात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता उद्धव ठाकरे रामनगर येथील राम मंदिराला भेट देणार आहेत. प्रथम उद्धव ठाकरे मंदिरात भगवान रामाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर राम रक्षा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. या आंदोलनात उद्धव ठाकरे मंदिराबाहेर जमलेल्या शिवसैनिक आणि समर्थकांना काय संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आदित्य ठाकरे, संजय राऊतांसह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार

या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख सतीश हरडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

विदर्भात संघटन बळकट करण्यासाठी बैठका

उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वी खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी गेल्या तीन दिवसांत विदर्भातील विविध जिल्ह्यांचा दौरा केला. या काळात पक्षाच्या संघटनात्मक बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती राहावी आणि पक्षाचे जाळे अधिक मजबूत व्हावे हा या बैठकींचा उद्देश असल्याचे पक्षाने सांगितले.

5 हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित

उबाठाकडून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. आंदोलन दुपारी 3 वाजता सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनाला 5 हजार कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय आंदोलनासाठी रस्त्यावर भव्य स्टेज बांधण्यात आला आहे. यासाठी पोलिस, नागपूर महापालिका यांच्याकडून आवश्यक परवानग्या घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. संपूर्ण परिसर भगव्या रंगात सजविण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आणि मोहन भागवत यांनाही निमंत्रण

उबाठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. तसेच हिंदुत्वाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे हिंदुत्वाच्या विषयावर कार्यक्रम आयोजित करताना मोहन भागवत यांना निमंत्रण देणे हे आमचे कर्तव्य आहे."

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे; राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात तीन दिवस होणार चांगला पाऊस, या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता