शिर्डीतून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा; 'खुर्चीचं रक्षण कर' म्हणत लगावला टोला

Published : Jun 29, 2026, 04:17 PM IST
Uddhav Thackeray at Shirdi

सार

उद्धव ठाकरे सध्या फुटीर खासदारांच्या मतदारांच्या संघांमध्ये सभा घेत आहेत. आज शिर्डीतील सभेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 

Uddhav Thackeray at Shirdi :  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी दौऱ्यातून पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. साईबाबांच्या दर्शनानंतर आपण देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचं रक्षण करण्याची प्रार्थना केली. कारण "बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे," असा मिश्कील टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यासोबतच त्यांनी दिल्लीच्या राजकारणापासून ते राज्यातील सत्तासमीकरणांपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य करत भाजप आणि शिंदे गटावर टीकेची झोड उठवली.

'फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर'

शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्य आणि देशावर आलेले संकट दूर व्हावे, भ्रष्ट राजवट संपुष्टात यावी आणि जनतेला चांगले दिवस यावेत, अशी प्रार्थना आपण केली. त्याचबरोबर "देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर, कारण त्यांचा पत्ता कापला जाणार आहे," असेही आपण साईबाबांना सांगितल्याचे त्यांनी मिश्कीलपणे नमूद केले. आपण कोणाचे वाईट चिंतत नसल्याचे सांगतानाच "प्रत्येकाचा शेवट ठरलेलाच असतो," अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली.

 

 

‘फडणवीसांना दिल्लीपर्यंत पोहोचू देऊ नका’

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिल्लीतील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. २०२९ च्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्याचा दावा करत त्यांनी काही जण फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले. "देवेंद्र फडणवीसांना इतकं गुंतवून ठेवा की ते दिल्लीपर्यंत पोहोचूच नयेत," असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला.

'शाहसेनेची चाल'; भाजपवरही टीका

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपपेक्षा शिंदे गटाचे खासदार अधिक निवडून आल्यामुळे भविष्यातील नेतृत्वाच्या समीकरणात बदल होऊ शकतो. "फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नऊ खासदार आले, तर शाहसेनेचे अधिक खासदार निवडून आले. त्यामुळे उद्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाल्यास फडणवीसांना मागे टाकले जाऊ शकते," असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी "फडणवीसांचे पंख छाटले जात आहेत," अशीही टीका केली.

राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एकाच विमानातून नागपूरचा प्रवास केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शिर्डीतून केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, त्यांच्या भाषणातील सूचक विधानांची विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nasrapur Case Verdict : 'हा न्यायाचा विजय'; नसरापूर प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
Nasrapur Case : अखेर न्याय मिळाला! नसरापूरच्या चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फाशी