Nasrapur Case : अखेर न्याय मिळाला! नसरापूरच्या चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फाशी

Published : Jun 29, 2026, 01:25 PM IST
Nasrapur Case

सार

Nasrapur Case : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणात पुणे विशेष न्यायालयाकडून अखेर आरोपीला शिक्षा सुनावली आहे. या सुनावणीवेळी पीडित चिमुकलीचे आई-वडील कोर्टात उपस्थितीत होते. 

Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करत हत्या केल्याचे प्रकरण घडले होते. या प्रकरणातील आरोपीला अखेर कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे ग्राह्य धरत मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केली. या निकालानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भीमराव कांबळेला फाशी

या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला यापूर्वीच दोषी ठरवण्यात आले होते. मात्र शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. अखेर सोमवारी विशेष न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, घटनेसंदर्भातील पुरावे, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचा विचार करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. सदर गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि समाजमनाला हादरवणारा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

खाऊच्या आमिषाने चिमुकलीवर अत्याचार

१ मे २०२६ रोजी आरोपी भीमराव कांबळे याने खाऊ देण्याचे आमिष दाखवून साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला. या संपूर्ण घटनेचे काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्यामध्ये आरोपी चिमुकलीला हात धरून नेताना स्पष्टपणे दिसत होता. याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपीविरोधात भक्कम पुरावे

या खटल्यात सरकारी पक्षाने आरोपीविरोधात ठोस पुरावे आणि तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती. विशेष म्हणजे, आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका घेतली होती. पीडित चिमुकलीचे आई-वडील न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

राज्यभर संताप

या प्रकरणानंतर राज्यभरातून आरोपीला मृत्युदंड देण्याची मागणी होत होती. विविध सामाजिक संघटनांनी मोर्चे काढले, तर अनेक राजकीय नेत्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. निकालाच्या दिवशी न्यायालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान या 6 जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता
Maharashtra Voter List 2026 : महाराष्ट्राच्या मतदार यादीत मोठा बदल; 2 कोटींहून अधिक नावे वगळली