मुसळधार पावसाने मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली, 18 गावांचा संपर्क तुटला

ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्यामार्फत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Jul 7, 2024 12:26 PM IST

ठाणे : जिल्ह्यात पहाटेपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकल वाहतूक सेवेवरही पावसाचा परिणाम झाला असून काही गाड्या उशिराने धावत आहेत. मुसळधार पावसामुळे मुरबाडहून वाशिंदकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिखले गावातील काळू नदीवरील पूल पुराच्या पाण्याखाली गेला आहे. या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे शहापूर तालुका आणि मुरबाड तालुक्यातील सुमारे 18 गाव-पाड्यांचा संपर्क पहाटेपासून तुटला आहे. त्यामुळे गावाकडून शहरांकडे जाणाऱ्या चाकरमानीसह दूध, भाजीविक्रेत्यांसह किरकोळ व्यापारी व नागरिकांची तारांबळ उडाली असून पुलाच्या अलिकडे व पलिकडे नागरिक अडकून पडले आहेत.

ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्यामार्फत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या पातळीवर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेऊन आहे. ज्या ठिकाणी पुराचा जास्त धोका आहे, त्या ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. काळू नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून डोंगर भागातील घाट माथ्यावर सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाकडून स्थानिक यंत्रणांना भुस्खलन होऊ शकणाऱ्या गावांची आणि क्षेत्रांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करुन तेथील स्थानिक जनतेला याबाबत माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

अनेक गावपाड्यांचा संर्पक तुटला

पुराच्या पाण्याखाली गेलेला पूल हा शिरगाव, चिखले, झापवाडी, मुरबाड तालुक्यातील गावांसाठी संपर्करस्ता आहे. याशिवाय शहापूर तालुक्यातील शेरा, अंबरचा मड, मासवणे, बावघर, भय या गावांचाही संपर्क तुटला आहे. या गावाच्या आसपास असलेल्या अनेक गावपाड्यांचा टिटवाळा, वाशिंद-मुरबाड, शहापूर शहरासोबतचा संपर्क तुटला आहे.

आणखी वाचा :

Ashadhi Wari 2024 : रविवारपासून विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू, दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांचे होणार दर्शन

Share this article