मुंबई : टीसीएसने सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम आयटी शहरांतील रिअल इस्टेटवरही जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये ही अस्थिरता अधिक स्पष्टपणे दिसून येऊ शकते.
बांधकाम तज्ज्ञ म्हणाले, "टीसीएस हे भारतीय IT क्षेत्राचे दिशा दर्शक मानले जाते. त्यामुळे जर ही कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांना कामावरून काढते आणि त्याच मार्गावर इतर IT कंपन्याही चालू लागल्या, तर रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. विशेषतः मध्यम व उच्च मूल्यांच्या घरांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर IT कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो."
2022 ते 2024 या काळात IT क्षेत्रातील वेतनवाढीमुळे आणि कोविडनंतर स्थलांतराच्या ट्रेंडमुळे घरांच्या खरेदीत मोठी तेजी दिसून आली होती. प्रीमियम हाउझिंग मार्केटमध्येही IT व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
24
बंगळुरूतील सकारात्मक संकेत
पण या परिस्थितीबाबत काही बिल्डर कंपन्यांचे मत वेगळं आहे. एक तज्ज्ञांनी सांगितले, “टीसीएसने देशभरातून 12,000 कर्मचारी कमी केले असले, तरी फक्त बंगळुरूमध्येच 2024-25 या वर्षात 1.2 लाखांहून अधिक नवीन IT नोकऱ्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे अशा एकट्या निर्णयाचा घरबाजारावर फारसा परिणाम होणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “2024-25 मध्ये देशभरात विक्रमी 79 दशलक्ष चौरस फूट ऑफिस स्पेस वापरली गेली असून त्यापैकी एकट्या बंगळुरूमध्ये 21.8 दशलक्ष चौरस फूट जागा भरली गेली आहे. त्यामुळे एकूण आर्थिक गती आणि घरबाजाराची मागणी मजबूत आहे.”
पुण्यातून चिंता व्यक्त
दरम्यान, पुण्यातील एका रिअल इस्टेट कंपनीच्या CEO ने वेगळी बाजू मांडली. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “2024 मध्ये पगार स्थिर राहिल्यामुळे IT क्षेत्रातील घर खरेदीतील मागणी अलीकडच्या तिमाहींत मंदावली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरी गेल्याने कामगार वर्गातील अनेक लोक महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलण्याची शक्यता आहे.”
34
टीसीएसचा दृष्टिकोन
टीसीएसने रविवारी आपल्या निवेदनात सांगितले की, ही कर्मचारी कपात कंपनीच्या “भविष्यासाठी तयार” होण्याच्या धोरणाचा भाग आहे. कंपनी तंत्रज्ञान, AI तैनात करणे, बाजार विस्तार आणि मनुष्यबळ पुनर्रचना यावर भर देत आहे.
गृहबाजारात विक्री घसरते
ANAROCK च्या आकडेवारीनुसार, 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत घरांची विक्री वर्षभरात 20% नी घटली आहे. 2024 मध्ये दुसऱ्या तिमाहीत 1.2 लाख युनिट्स विकली गेली होती, ती यावर्षी 96,285 वर आली आहे.
“नोकऱ्यांवरील असुरक्षितता ही घरबाजाराच्या वाढीसाठी घातक ठरते. अशी भीती असताना ग्राहक मोठ्या निर्णयांना स्थगित करतात. शिवाय, जागतिक राजकारणातील अस्थिरता, शेअर बाजारातील घसरण आणि टॅरिफ संदर्भातील प्रश्नांमुळेही अनिश्चितता वाढली आहे. परिणामी, बंगळुरू, हैदराबाद, पुणे या शहरांमध्ये अनेकांनी घर खरेदीचे निर्णय पुढे ढकलले आहेत.”
परंतु आशा कायम
“भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत पाया मजबूत आहे. शिवाय, भारतात स्वतःचे घर असावे ही भावना खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे अल्पकालीन अडचणी असूनही, दीर्घकालीन दृष्टिकोनात घरांच्या मागणीत पुनरुज्जीवन निश्चित आहे,” असेही एका तज्ज्ञांनी सांगितले.