शाळेच्या परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंक विक्रीस बंदी, नियम मोडल्यास होणार कारवाई

Published : Jul 03, 2026, 02:36 PM IST
cold drink

सार

शाळांच्या परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमाचे पालन न केल्यास थेट कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या परिसरात गुटखा, पानमसाला आणि सिगारेटप्रमाणे स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शाळेच्या 500 मीटरवरील परिसरात अशाप्रकारचे कोल्डड्रिंक विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. एफडीएच्या विभागाची सूत्रे हातात घेतल्यानंतर तुकाराम मुंढेंकडून ठिकठिकाणी फूड सेफ्टी संदर्भात धडक कारवाई करण्यात येत आहेत. अशातच आता स्टिंगच्या विक्रीसंदर्भातील निर्णय FDA मंत्री नरहरी झिरवळ यांनी जाहीर केला आहे.

स्टिंग विक्रीवर बंदी

राज्य सरकारने शाळांच्या 500 मीटर परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंकच्या विक्रीस बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता सदर निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयनानंतर शाळा परिसरातील दुकानांनी या नियमाचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर सरकारने या विषयाची गंभीर दखल घेतली.

स्टिंगवर बंदी का?

आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत स्टिंग एनर्जी ड्रिंकमध्ये असलेल्या कॅफेन आणि साखरेच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. विक्रम पाचपुते यांच्या मते, या दोन्ही घटकांचे मिश्रण मुलांमध्ये व्यसनाधीनता आणते. या प्रोडक्टसचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. यावर काय रिपोर्ट येतो त्यावरही लक्ष असेल. पण त्याचे मुलांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यावरही पाचपुते यांनी प्रश्न उपस्थितीत केला. याशिवाय 18 वर्षांखालील मुलांना स्टिंगची विक्री करण्यासाठी वेगळे नियम करावे. या संबंधित अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार द्यावेत. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कठोर धोरण तयार करावे अशीही मागणी पाचपुते यांनी सरकारकडे केली.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीवर भर

काही ठिकाणी शाळांच्या परिसरात स्टिंगची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे ड्रिंक्स खरेदी करू नयेत. तसेच आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शाळांमध्ये विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे. याबद्दलची माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली आहे.

सभागृहात तुकाराम मुंढे यांच्या उल्लेखावरून आक्षेप

याच चर्चेदरम्यान आमदार राहुल कुल यांनी राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांची संख्या आणि त्यांच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी तुकाराम मुंढे यांचा वारंवार 'मुंढे साहेब' असा उल्लेख केला. यावर आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. जाधवांनी म्हटले की, 'आपण स्वतः कॅबिनेट मंत्री आहात, त्यामुळे फक्त मुंढे असा उल्लेख करावा'.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

FDA Crackdown: मुंबई-पुण्यात FDA चा धडाका! हॉटेल, डार्क स्टोअर्सवर कारवाईचा बडगा
Palghar News : पालघरमध्ये हॉस्पिटलमध्ये घुसून दादागिरी, शिंदेंचा मोठा दणका; ७ शिवसेना पदाधिकाऱ्यांचं निलंबन