
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात दहावीच्या (SSC) परीक्षेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय परीक्षा केंद्रावर मराठी भाषेचा पेपर देण्यासाठी मूळ विद्यार्थ्यांच्या जागी 10 डमी उमेदवार बसले होते. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.
परीक्षा केंद्रावर हॉलतिकीट आणि शाळेचे ओळखपत्र तपासताना काही विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांवरील फोटो आणि प्रत्यक्ष पेपर देणाऱ्या व्यक्तींचे चेहरे जुळत नसल्याचे पर्यवेक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून हॉलतिकीट तपासण्यात आले. यावेळी काही हॉलतिकीट बनावट असल्याचे समोर आले.
पोलिसांच्या तपासानुसार, हे डमी उमेदवार सांगली, इचलकरंजी आणि कर्नाटकातील अथणी येथील आहेत. डमी उमेदवार सांगलीतील पोलिस, सैन्य आणि वन विभागाच्या भरतीची तयारी करून घेणाऱ्या एका अकादमीत निवासी अभ्यासक्रमासाठी दाखल आहेत. या अकादमीमार्फतच डमी उमेदवारांचे रॅकेट चालत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणात नऊ तरुण आणि एका अल्पवयीन व्यक्तीविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बीएनएसच्या कलम 319, 336 आणि 337 अंतर्गत कारवाई केली आहे. नऊ आरोपींना न्यायालयाने 24 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
डमी उमेदवारांऐवजी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर द्यायचा होता, त्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना एसएससी परीक्षेतील पुढील विषयांचे पेपर देता येणार नाहीत, अशी माहिती राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
डमी उमेदवारांनी पैसे मिळाले नसल्याचा दावा केला आहे. या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि यामागे संघटित रॅकेट आहे का, याचा मंगळवेढा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.