Solapur : सोलापूरात शेतकऱ्याची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची मागणी

Published : Sep 25, 2025, 11:43 AM IST
Solapur

सार

Solapur : वैराग तालुक्यातील दहिटणे गावातील शेतकरी लक्ष्मण गवसाने यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे व वाढत्या शैक्षणिक खर्चाच्या तणावाखाली आत्महत्या केली. 

Solapur : मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने व वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे वैराग तालुक्यातील दहिटणे येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. लक्ष्मण काशिनाथ गवसाने (रा. दहिटणे, ता. बार्शी) यांनी बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सासुरे शिवारामधील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. मंगळवारी दुपारी घरातून बाहेर पडलेले लक्ष्मण परतले नाहीत, त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.

गवसाने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांची मुलगी बीएससीचे शिक्षण सोलापूर जिल्ह्याबाहेर घेत होती, तर मुलगा इंजिनिअरिंग शिकत होता. वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे त्यांच्यावर मानसिक तणाव वाढला होता. त्यांच्याकडे सासुरे येथे दीड एकर कोरडवाहू जमीन होती. याच शेतीतून वर्षभराची उपजीविका चालायची, मात्र आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पीक पूर्णपणे कुजून गेले आणि नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

चिठ्ठीत काय लिहिलेय? 

पोलीसांनी तपास करताना गवसाने यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत, “माझ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री उचलावी, आमदार-खासदारांनी मदत करावी”* असा उल्लेख आहे. तसेच, मुलांचे शिक्षण थांबू नये, याची जबाबदारी घेण्याची विनंती त्यांनी स्पष्टपणे केली होती. यामुळे या घटनेने शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाला नवा आयाम दिला आहे.

काही दिवसांपासून गवसाने यांना शुगर आणि मुळव्याधचा त्रासही होत होता. शेतीचे नुकसान, आरोग्य समस्या, शैक्षणिक खर्च आणि वारंवार होत असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला नैराश्याचा ताण सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, बार्शी तालुक्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघड होताच गावकुसासह जिल्हाभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

BMC Elections 2025 : महानगरपालिका निवडणुका लवकर? मतदारयाद्या 10 डिसेंबरला; आचारसंहिता 15 ते 20 तारखेदरम्यान लागू होण्याची शक्यता
तुमचं रेल्वे स्टेशन 'वगळलं' गेलंय का? पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मोठा बदल... संगमनेरचा पत्ता कट, वाचा अहिल्यानगरचं भविष्य!