
Solapur : राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने (BJP) याच पार्श्वभूमीवर मेगा भरती मोहीम हाती घेतली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षात मोठे नेते आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, काल रात्री मुंबईत वर्षा निवासस्थानी चार माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली.
या बैठकीनंतर सोलापूरमधील अनेक दिग्गज नेते, माजी उपमहापौर आणि नगरसेवकांनी भाजप प्रवेशाची तयारी केली आहे. माजी उपमहापौर पद्माकर काळे, दिलीप कोल्हे, सुरेश पाटील, बिज्जू प्रधान यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर हे उपस्थित होते.
या मोठ्या प्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, लवकरच पक्षप्रवेश होईल अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, इतर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, कल्पना क्षीरसागर, सुनील भोसले आणि इतरांनीही भाजपात घरवापसी केली आहे.
काल रात्री झालेल्या बैठकीत अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत तात्या माने, दिलीप माने आणि रणजीत शिंदे हे उपस्थित होते. सध्या रणजीत शिंदे अमेरिकेत उपचार घेत असले तरी त्यांचा पुत्र विक्रम शिंदे बैठकीला हजर होता. या बैठकीत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी भाजपला बळकटी देण्यासाठी रणनीती आखण्यात आली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्थानिक पातळीवर विरोधी पक्ष आणि मित्र पक्षांना धक्का देण्याची तयारी केली आहे. या प्रवेश सोहळ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठे राजकीय बळ मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटातील प्रा. शिवाजी सावंत, दिग्विजय बागल आणि सांगोला-पंढरपूरमधील काही नेतेही भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असल्याचे संकेत मिळत आहेत.