
Nashik : नाशिकच्या सातपूर परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर अटकेत असलेले आरपीआय नेते प्रकाश लोंढे पुन्हा चर्चेत आले आहेत. लोंढे यांच्या नंदिनी नदीच्या पुररेषेत बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हातोडा पडणार आहे. नाशिक पोलिसांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून, महापालिकेनेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांच्या अवैध बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.
सुमारे 25 बाय 15 मीटर आकाराची ही इमारत तीन-चार वर्षांपूर्वी नंदिनी नदीच्या पुररेषेत बांधली गेली होती. तळमजला आणि पहिला मजला असलेल्या या इमारतीत भाडेकरू ठेवून भाडे वसूल केलं जात होतं. गोळीबार प्रकरणातील चौकशीत प्रकाश लोंढे आणि त्याचा पुत्र दीपक लोंढे यांच्या कबुलीजबाबांवरून या इमारतीवर कारवाईला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दुसऱ्या इमारतीत ‘भुयार’ सापडल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे ही इमारतही गुन्हेगारीसाठी वापरली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आयटीआय सिग्नल परिसरातील एका बारमध्ये खंडणी उकळण्यासाठी झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात प्रकाश लोंढेचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला होता. भूषण लोंढे सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याच्या अड्ड्यांवर आणि इमारतींवर कठोर कारवाई सुरू केली असून, सातपूर परिसरात मोठा फौजफाटा तैनात आहे. या कारवाईतून नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे की, शहरात गुन्हेगारीला जागा नाही.
प्रकाश लोंढे यांच्या इमारतीत मोठ्या लोखंडी सांगाड्यांवर प्रचंड आकाराचे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. या माध्यमातून परिसरात दहशत निर्माण केली जात होती आणि लाखोंची बेकायदेशीर कमाई केली जात होती. या इमारतीच्या पाडकामानंतर परिसरातील झोपडपट्टीतील इतर अनधिकृत बांधकामांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.