
Sinhagad close : पुणेकरांचे आवडते पर्यटनस्थळ असलेला सिंहगड किल्ला सध्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तीन दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ३१ मे ते २ जून या कालावधीत सिंहगडावर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती वन विभागाने दिली आहे.
वन विभाग, पुरातत्त्व विभाग, महसूल विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गडावर बेकायदेशीर बांधकामांविरोधात मोहीम राबवली जात आहे. यामध्ये परवानगीशिवाय उभारलेली हॉटेल, दुकाने, घरांचे आरसीसी बांधकामे हटविण्याचे काम सुरू आहे.जेसीबी वापर शक्य नसल्यामुळे सर्व कामे मनुष्यबळाने, हाताने केली जात आहेत. त्यामुळे ही मोहीम अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेते आहे.
पर्यटकांना ३१ मे (शुक्रवार), १ जून (शनिवार) आणि २ जून (रविवार) या तीन दिवसांत गडावरील कोणत्याही मार्गाने – अगदी पायवाटेनेही – पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.सिंहगड पुण्यापासून जवळ असल्यामुळे शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. मागील आठवड्यात तर संपूर्ण घाटामध्ये गाड्यांची प्रचंड कोंडी झाली होती.सध्या सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गडावर जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांनी तो काही दिवसांसाठी पुढे ढकलावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
"सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांनी संयम बाळगावा. ही कारवाई किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अत्यावश्यक आहे," असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.