UBT MPs Rebellion : ठाकरे गटात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? उद्धव ठाकरेंच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष

Published : Jun 17, 2026, 08:51 AM ISTUpdated : Jun 17, 2026, 10:15 AM IST
UBT MPs Rebellion

सार

UBT MPs Rebellion : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे खरंच, युबीटीचे खासदार फुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

UBT MPs Rebellion : वर्ष 2022 मध्ये झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा एकदा राजकीय संकटाच्या भोवऱ्यात अडकल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. युबीटी पक्षाचे 9 पैकी 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या (19 जून) पार्श्वभूमीवर नक्की काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

याशिवाय आज (17 जून) उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली असून यामध्ये संजय राऊत देखील उपस्थितीत असणार आहेत. या व्यतिरिक्त पत्रकार परिषदेला किती खासदार उपस्थितीत राहणार हे पाहणे महत्वाचे आहे. खरंतर, उद्धव ठाकरे खासदारांना फुटण्यापासून दूर ठेवण्यासाठी धडपड करतायत असे दिसून येत आहे. 

दिल्लीत वाढल्या हालचाली

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. तर पुढील काही दिवसांत आणखी खासदार दिल्लीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या खासदारांची शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक होण्यासह यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या चर्चांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

मातोश्रीवरील बैठकीनंतर चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पक्षाचे सर्व खासदार उपस्थितीत नसल्याचे लक्षात आले. या बैठकीत पाच खासदार अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पक्षाकडून काही खासदार ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाल्याचे म्हटले. मात्र काही खासदारांच्या स्वतंत्र बैठका आणि राजकीय हालचालींमुळे पक्षामध्ये अस्थिरता निर्माण झाल्याच्या चर्चेने जोर धरला.

उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

या घडामोडींवर दोन दिवस मौन बाळगल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी वर्ष 2022 मध्ये झालेल्या बंडाची आठवण करून दिली. या परिस्थितीची पूर्वकल्पना होतीच असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, "आजचा दिवस कदाचित आपला नसेल, पण उद्या नक्कीच आपला असेल. तोपर्यंत संघर्ष सहन करावा लागेल,"

पक्षाकडून फुटीच्या चर्चा फेटाळल्या

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी पक्षातील फुटीच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल देसाई यांनी सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत असल्याचे म्हटले. तर आदित्य ठाकरे यांनी देखील कोणताही खासदार पक्ष सोडणार नसल्याचा दावा केला आहे. तर दिल्लीत उद्या शिवसेनेच्या लोकसभेच्या सदस्यांची कार्यालयात बैठक पार पडणार आहे. 

 

 

संजय राऊत यांचा गंभीर आरोप

या सर्व घडामोडींमध्ये शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून गंभीर आरोप केले आहेत. काही खासदारांना पक्षांतरासाठी मोठ्या आर्थिक ऑफर दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. याबद्दलचे एक ट्विट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर संजय राऊत यांनी केले. याशिवाय ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. 

 

 

महायुतीसाठी राजकीय फायदा?

जर ठाकरे गटातील खासदारांनी पक्षांतर केले, तर त्याचा थेट फायदा केंद्रातील सत्ताधारी महायुतीला होण्याची शक्यता दाट आहे. आगामी संसदेच्या अधिवेशनात महत्त्वाच्या विधेयकांसाठी संख्याबळ वाढविण्याच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे, ठाकरे गटामध्ये हा आणखी एक मोठा भूंकप ठरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम

वर्ष 2022 मधील शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झाल्याचे दिसून आले. आता पुन्हा एकदा ठाकरे गटातील संभाव्य खासदारांच्या फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत या घडामोडी कोणते वळण घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

FDA Crackdown: मुंबई-पुण्यात FDA चा धडाका! हॉटेल, डार्क स्टोअर्सवर कारवाईचा बडगा
Palghar News : पालघरमध्ये हॉस्पिटलमध्ये घुसून दादागिरी, शिंदेंचा मोठा दणका; ७ शिवसेना पदाधिकाऱ्यांचं निलंबन