सुषमा अंधारे - अंजली दमानिया यांची जुंपली, आरोप-प्रत्यारोप करत एकमेकींना सुनावले

Published : May 03, 2025, 06:35 PM ISTUpdated : May 03, 2025, 08:59 PM IST
sushma andhare

सार

'सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार?', असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया एका ग्रुपवर म्हणाल्या. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे भडकल्या.

मुंबई - 'सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार?', असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया एका ग्रुपवर म्हणाल्या. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे भडकल्या. 'ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे का', असे म्हणत सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केला. अंधारेंनी तो स्क्रीनशॉटही पोस्ट केला. त्यावर अंजली दमानियानी उत्तर देत अंधारेंना चिमटा काढत उलट सवाल केला आहे.

अंजली दमानिया यांच्या सुषमा अंधारे अजित पवार गटात जाणार? या प्रश्नार्थक विधानावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले. त्यामुळे सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांना सुनावले.

सुषमा अंधारे अंजली दमानियांना काय म्हणाल्या?

"अहो दमानिया, जरा दमानं घ्या की... किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस.. कधीतरी पूर्ण, महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला", अशा शब्दात सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांवर निशाणा साधला. "ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही माझ्या PR म्हणून काम करत आहात की, ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे", असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी दमानियांवर केला.

 

 

 

 

सुषमा अंधारेंना अंजली दमानियांचे उत्तर?

सुषमा अंधारेंनी ओबीसी नेते आणि चळवळींना टार्गेट करण्याचा गंभीर आरोप केल्यानंतर अंजली दमानियांनीही उत्तर दिले. दमानिया म्हणाल्या, "केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता? छान… असो... मला तर ते पण करता येणार नाही. कारण केवळ अंधार आहे", असा टोला त्यांनी सुषमा अंधारेंना लगावला. "खरंतर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही, पण तुम्ही जे शब्द वापरले, त्यावर वाईट वाटले. मला खात्रीशीर माहिती अगदी, फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती की, तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात. हे खरे आहे की नाही ह्यावर खरं उत्तर द्याल का?", असा उलट सवाल दमानियांनी सुषमा अंधारेंना केला.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, “बातमी करायची असती, तर तेव्हाच केली असती. पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो, म्हणून बोलले नाही. तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा, तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा.”

 

 

PREV

Recommended Stories

Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!