
वसमत: भरधाव वेगात आलेल्या मातीच्या टिप्परने डिव्हायडर तोडत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थांबलेल्या प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिली आणि त्याच ऑटोवर उलटला. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना ३ मे रोजी दुपारी १.१५ वाजता वसमत शहरातील कवठा रोडवरील मदिना चौकात घडली.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये
यास्मिन बेगम मोईन खान (वय २८, रा. मनमाड)
शोएब खान जलील खान (वय १६, रा. कुरुंदा, ता. वसमत)
यांचा समावेश आहे.
तर अफ्फान मोईन खान (५), आझाद मोईन खान (७) दोघेही यास्मिन यांचे मुले आणि संतोष असाराम खनके (४०, रा. श्यामनगर, वसमत) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त टिप्पर (एमएच २० सीटी ९७९७) परभणीकडून माती घेऊन वसमतजवळील विटभट्टीकडे जात होता. मदिना चौकात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टिप्परने मधल्या डिव्हायडरला धडक दिली. तो थेट समोर थांबलेल्या प्रवासी ऑटो (एमएच ३८ डब्ल्यू ०१९७) वर आदळला आणि त्यावर उलटला. ऑटोतील प्रवासी टिप्पर आणि मातीखाली दबले गेले.
अपघात एवढा भीषण होता की, टिप्पर उलटल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढणे अशक्य झाले. अखेर क्रेनच्या सहाय्याने टिप्पर बाजूला करून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा यास्मिन बेगम आणि शोएब यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आणि संतप्त नागरिकांनी संताप व्यक्त केला.
या अपघाताची माहिती मिळताच आमदार राजू नवघरे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्रवासी ऑटोमधील सर्व जण वसमत येथे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. परंतु, कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधीच काळाने त्यांच्या वाटेत घाला घातला.
मदिना चौक हे वसमत शहरातील गजबजलेलं ठिकाण आहे. भरदुपारी काही क्षणातच घडलेला अपघात पाहून नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला, तर टिप्पर चालक आणि मालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला आहे.
या अपघाताने पुन्हा एकदा वेग आणि बेफिकिरीने चालवलेल्या अवजड वाहनांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जिवंत राहिलेल्या जखमींसाठी तातडीने वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.