
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची मशाल तेवत ठेवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे हल्ला करण्यात आला. शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर वंगण टाकून चेहरा काळा करण्याचा प्रकार केला. या घटनेमुळे राज्यभरात तीव्र सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हल्ल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः प्रविण गायकवाड यांना फोन करून विचारपूस केली. शरद पवारांनी गायकवाड यांच्याकडून थेट हल्ल्याचा संपूर्ण तपशील जाणून घेतला. "हल्लेखोर कोण होते?", "ते कुठून आले?", "तुम्हाला मारहाण झाली का?", "घटनास्थळी पोलीस उपस्थित होते का?" असे अनेक प्रश्न पवारांनी विचारले.
गायकवाड यांनी शरद पवारांना सांगितले, “मी अक्कलकोटमध्ये सत्काराच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. गाडीतून उतरताच दुसऱ्याच मिनिटाला शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर वंगण टाकले. आक्रमकपणे अंगावर चालून येत त्यांनी कपडे फाडण्याचा प्रयत्न केला.” या माहितीने पवार चिंतीत झाले असल्याचे सांगितले जात आहे.
सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दीपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, भवानेश्वर बबन शिरगिरे (राहणार इंदापूर) तसेच कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबु बिहारी (राहणार बारामती) यांचा समावेश आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित अद्याप फरार आहेत.
दरम्यान, दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काटे हा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा केला आहे. आता शरद पवार या घटनेवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रवीण गायकवाड यांची प्रतिक्रिया
प्रवीण गायकवाड यांनी त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. गायकवाड म्हणाले की, माझ्यावर अज्ञातपणे हल्ला केला. एवढेच नव्हे मला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. डॉ.गौरी शंकर, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमागे याच विचारसणीची लोक होती. याच लोकांनी माझ्यावर हल्ला केला आहे. संभाजी ब्रिगेड देशामध्ये मानवता प्रस्थापित करण्याचे काम करत आहे. पुढे गायकवाड म्हणाले की, "ही शेवटची सुरुवात आहे. माझ्या हत्येच्या प्रयत्नाला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे."