Cyclone Shakhti: अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ सक्रिय झाले असून, हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी अतिदक्षतेचा इशारा दिला. या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार असून, पाऊस, वाऱ्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले
Cyclone Shakhti: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या "शक्ती" या चक्रीवादळाने राज्यावर नवे संकट निर्माण केले आहे. हवामान विभागाने याबाबत महाराष्ट्रासाठी ‘अतिदक्षतेचा इशारा’ दिला आहे.
28
चक्रीवादळ शक्तीची ताकद
या हंगामातील पहिलं चक्रीवादळ "शक्ती" अरबी समुद्रात वेगाने विकसित होत आहे. हे नाव श्रीलंकेने दिलं आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.
38
कुठे होणार सर्वाधिक परिणाम?
चक्रीवादळाचा परिणाम प्रामुख्याने उत्तर कोकण व दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे सर्वाधिक धोक्यात आहेत. या भागात 100 किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात, तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला राहील. विशेषतः 5 ऑक्टोबरपर्यंत समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक राहणार आहे. हवामान विभागाने मासेमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. उंच लाटा आणि वेगवान समुद्री प्रवाह जीवघेणा ठरू शकतो.
58
सखल भागांतील नागरिक सतर्क राहा
सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उत्तर कोकणासोबतच विदर्भाच्या पूर्व भागात व मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांतही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुराचा धोका संभवतो.
68
प्रशासन सज्ज, आपत्ती व्यवस्थापन सक्रिय
IMD च्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबरच, धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी करण्यात आली आहे.
78
वाहतूक, जनजीवनावर परिणामाची शक्यता
विशेषतः मुंबई आणि आसपासच्या परिसरात अतिवृष्टीमुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
88
शक्ती चक्रीवादळामुळे राज्याला निर्माण झाला धोका
चक्रीवादळ शक्तीमुळे राज्याला धोका निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस आणि वादळाच्या शक्यतेमुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. शासन आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची काळजी घ्या.