मिस इंडिया अर्थ स्पर्धक सायली सुर्वेचे ‘शुद्धीकरण’; प्रेमविवाहानंतर पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश

Published : Mar 09, 2026, 02:04 PM IST
Sayli Surve Miss India 2019

सार

२०१९ च्या मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली पिंपरी-चिंचवडमधील सायली सुर्वे पुन्हा चर्चेत आली आहे. प्रेमविवाहानंतर धर्मांतर केल्याचा आरोप करत तिने हिंदुत्ववादी संघटनांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश घेतला आहे. या घटनेमुळे धर्मांतर, प्रेमविवाह आणि वैवाहिक वाद यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील आणि २०१९ च्या मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली सायली सुर्वे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सायली सुर्वे हिचे धार्मिक विधी करून शुद्धीकरण करण्यात आले असून तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या उपस्थितीत होम-हवन, मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधी पार पाडत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

प्रेमविवाहानंतर नावात बदल

सायली सुर्वेने २०१९ मध्ये मीरा भाईंदर येथील उद्योजक आतिफ तासे यांच्याशी घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर सायलीचे नाव बदलून अतेजा तासे असे ठेवण्यात आले होते. मात्र लग्नानंतर आपल्यावर सतत मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप सायलीने केला आहे. तसेच या विवाहानंतर आपले धर्मांतर करण्यात आल्याचाही दावा तिने केला.

पोलिसांकडे तक्रारी, मात्र अपेक्षित प्रतिसाद नाही

सायलीने या संदर्भात अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केल्याचे सांगितले. मात्र आपल्या तक्रारींवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप तिने केला आहे. सततच्या छळामुळे आपण मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झालो होतो. अनेक प्रयत्नांनंतर आपण हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या मदतीने शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पडली, असे सायलीने सांगितले.

धार्मिक विधी करून शुद्धीकरण

पिंपरी-चिंचवड परिसरात सायली सुर्वेचे शुद्धीकरण करण्यासाठी विशेष धार्मिक विधी करण्यात आले. यामध्ये होम-हवन, मंत्रोच्चार आणि इतर धार्मिक परंपरांनुसार विधी पार पाडण्यात आले. या प्रक्रियेनंतर तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला.

‘माझ्यासारख्या मुलींनी हार मानू नये’ – सायली सुर्वे

या वेळी बोलताना सायली सुर्वे म्हणाली की, “मला जातीवाद करायचा नाही, मात्र फरक नक्कीच असतो. आपल्या लोकांनी आपल्या पाठीशी उभे राहणे खूप महत्त्वाचे असते. माझ्यासारख्या परिस्थितीत अडकलेल्या मुलींनी हार मानू नये.” ती पुढे म्हणाली की, “मी जवळपास दहा वर्षे अन्याय सहन केला, कारण माझी चार मुले आहेत. आई म्हणून मुलांचा विचार करून मी इतकी वर्षे संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र एक वेळ अशी आली की माझी सहनशक्ती संपली आणि शेवटी मला हा निर्णय घ्यावा लागला.”

घटनेमुळे पुन्हा चर्चा

दरम्यान, सायली सुर्वेच्या शुद्धीकरणाच्या या घटनेमुळे धर्मांतर, प्रेमविवाह आणि वैवाहिक वाद या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाकडे सामाजिक आणि राजकीय वर्तुळातूनही लक्ष वेधले जात असून पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; मदतीसाठी सरकारची तयारी सुरू
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका