पुण्यात दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; महिला PSI च्या हाताला चावा

Published : Mar 07, 2026, 11:24 AM IST
Pune

सार

पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्यात 3 मार्चच्या मध्यरात्री एका तरुण-तरुणीने दारूच्या नशेत गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. रेस्टॉरंटमध्ये झालेल्या वादानंतर हे दोघे थेट पोलीस ठाण्यात गेले आणि पोलिसांनाच धमकावले. 

Pune : पुणे शहरातील बाणेर परिसरातील पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत एका तरुण-तरुणीने मध्यरात्री धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. 3 मार्चच्या रात्री हा प्रकार घडला असून तरुणीने संतापाच्या भरात महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताला चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, धमकी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेस्टॉरंटमधील वादातून पोलीस ठाण्यात गोंधळ

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण आणि तरुणी बालेवाडी येथील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेले होते. मद्यपान केल्यानंतर दोघांनी रेस्टॉरंटमध्ये गोंधळ घालत त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाकडे सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केली. मात्र फुटेज मुंबईत असून ते दुसऱ्या दिवशी मिळेल, असे व्यवस्थापकाने सांगितल्याने दोघांचा संताप अनावर झाला.

पोलीस ठाण्यात पाच तास धिंगाणा

यानंतर दोघे थेट बाणेर पोलीस ठाण्यात गेले आणि पोलिसांशीच वाद घालू लागले. रात्री सुमारे 11.45 वाजता सुरू झालेला हा गोंधळ पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी संतप्त झालेल्या तरुणीने महिला पोलीस उपनिरीक्षकासमोर आरडाओरडा करत त्यांच्या युनिफॉर्मला हात घातला आणि त्यांच्या हातावर चावा घेतला.

 “माझ्या पावरने नोकरी घालवतो”

या दरम्यान युवराज निलेश परतानी (वय 24) यानेही पोलिसांना धमकी दिली. “मी माझ्या पावरने तुमची नोकरी घालवतो,” असे तो म्हणाला. तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घालण्याची धमकीही दोघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणी विद्यार्थिनी, तरुण हरियाणाचा

युवराज निलेश परतानी हा मूळचा हरयाणा राज्यातील असून सध्या पुण्यात नोकरी करतो. संबंधित तरुणी ही पुण्यात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलीसही काही काळ हैराण झाले होते.

गुन्हा दाखल, पोलिसांचा शोध सुरू

या प्रकरणी दोघांविरुद्ध दारूच्या नशेत गोंधळ घालणे, धमकी देणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघेही पोलीस ठाण्यात आलेले नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक