
महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात पाणीच पाणी आणि चिखलाच चिखल भरला आहे. अशा कठीण परिस्थितीत साताऱ्यातील एका तरुणाने केलेलं काम पाहून सगळेच थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पठ्ठ्यानं चक्क आपल्या बाईकला खांद्यावर उचलून शेतातल्या चिखलातून बांधावर नेलं आहे!
हा व्हिडीओ आहे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातल्या कुळकजाई गावातील विनय घोरपडे या तरुणाचा. मुसळधार पावसामुळे गावात सर्वत्र चिखल झाला आहे, रस्ते बंद झाले आहेत, पण विनयनं हार मानली नाही. शेतातली वाट चिखलानं भरली होती, आणि बाईक चालवणं अशक्य झालं. मग काय, पठ्ठ्यानं बाईक चक्क खांद्यावर घेतली आणि बांधावरून पुढचा मार्ग कापला!
हा व्हिडीओ पाहून लोक फक्त पावसाचा नव्हे तर विनयच्या ताकदीचाही गौरव करत आहेत. एका साध्या तरुणानं चिखलातून, नदी-नाल्यांच्या उधळलेल्या रस्त्यांमधून स्वतःची बाईक उचलून नेणं ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. व्हिडीओसोबत अनेकांनी “बॉडीबिल्डर पठ्ठा” म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.
हा स्टंट जितका जबरदस्त वाटतो, तितकाच तो धोकादायकही आहे. बाईकचा तोल गेला असता, तर विनयला मोठी दुखापत होऊ शकली असती. त्यामुळे असा स्टंट कोणीही घरी किंवा रस्त्यावर करून पाहण्याचा प्रयत्न करू नये.
सध्या माण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून, रस्ते अपुरे पडत आहेत. शेतकरी आणि गावकरी अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत विनयसारख्या तरुणांची धाडसी कर्तबगारी समाजासाठी प्रेरणादायी ठरते.
पावसाचं थैमान सुरु असतानाच विनय घोरपडेनं दाखवलेली हिमंत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर त्याच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला असून, हा पठ्ठ्या खरंच "चिखलात चमकलेला हिरो" बनला आहे.