
Baramati Rain Updates : गेल्या अनेक वर्षांच्या प्रचलित अंदाजांना छेद देत मान्सूनचा जोर पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड वाढला आहे. बारामती, दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागांत मुसळधार पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडाली आहे.बारामती तालुक्यात वार्षिक 14 इंच पावसाच्या सरासरीपैकी तब्बल 7 इंच पाऊस रविवारी एका दिवसात पडल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नीरा डावा कालवा फुटल्याने पाणी थेट पालखी महामार्गावर आलं असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अजित पवार सोमवारी पहाटेच मैदानात उतरले. त्यांनी कान्हेरी व काटेवाडी गावांना भेट दिली. कान्हेरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा थेट अजित पवारांना दाखवला.बारामती तालुक्यात वर्षभरात सरासरी 450 मिमी पाऊस पडतो. यापैकी 314 मिमी पाऊस केवळ 5 दिवसांत झाला आहे. त्यामुळे शेतात पाणी शिरून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
पिंपळी येथे नीरा डावा कालवा फुटल्याने परिसरातील अनेक घरे जलमय झाली आहेत. पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.दौंडमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर पाण्याचा जोर एवढा होता की एक इनोव्हा कार वाहून गेली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माळशिरस तालुक्यात नीरा नदीला पूर आल्याने नातेपुते–बारामती मार्ग बंद करण्यात आला आहे. कुरभावी येथील एका कुटुंबाला एनडीआरएफने रात्री अडीच वाजता वाचवले. संग्राम नगर येथून 15–20 कुटुंबांना हलविण्यात आले. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले की, या भागात 500 पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
संपूर्ण भागात मुसळधार पावसामुळे शेती, वाहतूक, वस्ती यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.