Soldier Pramod Jadhav Accident : अवघ्या आठ तासांच्या लेकीला वडिलांचे छत्र हरपले; अपघातात शहीद जवान प्रमोद जाधव यांना अखेरचा निरोप

Published : Jan 12, 2026, 08:42 AM ISTUpdated : Jan 12, 2026, 10:35 AM IST
Soldier Pramod Jadhav Accident

सार

Soldier Pramod Jadhav Accident : सातारा जिल्ह्यातील दरे गावचे रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद परशुराम जाधव हे पत्नीच्या प्रसूतीसाठी रजा घेऊन गावी आले असताना अपघातात शहीद झाले. 

Soldier Pramod Jadhav Accident : जन्माच्या अवघ्या काही तासांतच एका चिमुकल्या लेकीच्या नशिबी वडिलांचे छत्र हरपण्याची हृदयद्रावक घटना सातारा जिल्ह्यात घडली. अपघातात शहीद झालेले भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद परशुराम जाधव यांचे तिरंग्याने आच्छादित पार्थिव गावात दाखल होताच संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. आनंदाच्या क्षणी दुःखाने घाला घातल्याने गावासह संपूर्ण जिल्हा सुन्न झाला.

पत्नीच्या प्रसूतीसाठी रजा, पण काळाने साधला घात

भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद–श्रीनगर येथे सेवा बजावणारे प्रमोद परशुराम जाधव हे पत्नीच्या प्रसूतीसाठी काही दिवसांची रजा घेऊन गावी आले होते. घरात नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. सातारा तालुक्यातील दरे गावचे रहिवासी असलेले प्रमोद जाधव हे दुचाकीवरून जात असताना वाढे फाटा परिसरात भरधाव आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

 

गावात पार्थिव दाखल होताच शोककळा

अपघाताची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तर दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली. आज सकाळी तिरंग्याने झाकलेले पार्थिव गावात दाखल होताच “अमर रहे, अमर रहे, प्रमोद परशुराम जाधव अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानाच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या जात असतानाच कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

नवजात लेकीचे पित्याला अखेरचे दर्शन

या घटनेतील सर्वात हृदयद्रावक क्षण तो ठरला, जेव्हा अवघ्या आठ तासांपूर्वी जन्मलेल्या प्रमोद जाधव यांच्या कन्येला पित्याच्या अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. ज्या लेकीला वडिलांचा पहिला स्पर्शही लाभला नाही, तिने जन्माच्या काही तासांतच वडिलांचे निर्जीव रूप पाहिले. त्या निरागस बाळाकडे पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले, तर नुकतीच बाळंतपणातून सावरत असलेल्या पत्नीचा आक्रोश संपूर्ण परिसर स्तब्ध करणारा होता.

 

 

शासकीय इतमामात लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार

वीर जवान प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात आणि पूर्ण लष्करी सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “अमर रहे”च्या घोषणांमध्ये देशसेवेसाठी सदैव सज्ज असलेल्या या जवानाला भावपूर्ण मानवंदना देण्यात आली.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी भावूक

या अंत्यसंस्काराचा आणि कुटुंबीयांच्या आक्रोशाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवजात लेकीचे वडिलांना अखेरचे दर्शन आणि पत्नीचा आक्रोश पाहून नेटकरी भावूक प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी जवानाच्या शौर्याला सलाम करत कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ladki Bahin Yojana: महापालिका निवडणुकीआधी ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे देण्याचा दावा; निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना खुलाशाचे आदेश
ST Bus Fare Hike : प्रवाशांना महागात बसणार एसटीचा प्रवास! लालपरीपासून शिवनेरीपर्यंत वाढले तिकीट दर