
मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण सध्या फारच रंगतदार व अस्थिर वाटतंय. एका बाजूला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात रम्मी खेळतानाचा कथित व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय, तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या एका ट्विटनं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राऊत यांनी थेट "महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी सुरू होतील," असं भाकीत वर्तवलं असून, त्यावरून विविध राजकीय संकेत घेतले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात रम्मी खेळत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं पसरला. या व्हिडीओमुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली. मात्र, कोकाटे यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की, "मी रम्मी खेळत नव्हतो, विधानसभेचं कामकाज यूट्यूबवर पाहत होतो. त्यावेळी जाहिरात आली, ती स्किप करत असतानाचा तो क्षण आहे."
या सगळ्या पार्श्वभूमीवर, काल मुंबईत दोन वरिष्ठ नेत्यांच्या गुप्त बैठकीची चर्चा उफाळून आली. याचवेळी खासदार संजय राऊत यांनी केलेलं एक ट्विट चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. त्यांनी त्यात थेट मंत्रिमंडळातील हालचाली, अमित शहांचा हस्तक्षेप आणि आगामी राजकीय उलथापालथींचा इशारा दिला आहे.
“फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी! मी दिल्लीत आहे; चार मंत्री नक्की घरी जात आहेत; पाचवा गटांगळ्या खात आहे. मिंधे, अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला! महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील.” या ट्विटमधून त्यांनी सूचक भाषेत अनेक गोष्टींचे संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार? कोणीतरी बाहेर जाणार? की नव्या युतीची जमिनी तयार होतेय?
या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी बाब लक्षवेधी ठरतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळीक. अधिवेशनादरम्यान फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेची ऑफर दिल्याचं बोललं जातंय. उद्धव ठाकरे यांनी त्यावर संयत प्रतिक्रिया देत ‘कामकाज खेळीमेळीने सुरू आहे’ असं सांगितलं. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा उफाळली आहे.
संजय राऊत सध्या दिल्लीमध्ये असून उद्यापासून सुरु होणाऱ्या संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केलं आहे. ही टाइमिंग काहीतरी सांगतेय का? सत्तांतराची चाहूल लागतेय का? हे प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात घर करत आहेत.
महाराष्ट्रातील राजकारण नव्या टप्प्यावर जात आहे हे निश्चित. मंत्रिमंडळातील संभाव्य बदल, गुप्त भेटी, ट्विटमधून दिले जाणारे संकेत आणि विरोधकांची आक्रमक भूमिका हे सगळं एकत्र पाहता आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संजय राऊत यांच्या ट्विटनं महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर नवा रंग भरला आहे. कोकाटे प्रकरण असो, की गुप्त भेटी सगळं काही एका मोठ्या ‘प्लॉट’ची झलक वाटतेय. आता खरा स्फोट कधी होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.