
पालघर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर आज वसईमध्ये मोठा प्रसंग ओढवला. एका कार्यक्रमासाठी आले असताना ते लिफ्टमध्ये अडकले आणि काही काळासाठी प्रचंड गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत लिफ्टचे दरवाजे तोडले आणि त्यांची सुटका केली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे.
प्रवीण दरेकर हे वसई पश्चिमेकडील एका सभागृहात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास मार्गदर्शन शिबिरासाठी आले होते. या हॉलच्या इमारतीत ते लिफ्टने वर जाण्याचा प्रयत्न करत असताना, 10 व्यक्तींची क्षमता असलेल्या लिफ्टमध्ये तब्बल 15 जण शिरले. परिणामी, लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जाण्याऐवजी थेट तळमजल्यावर येऊन बंद पडली.
लिफ्ट बंद पडताच काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला. लिफ्टमध्ये अडकलेले दरेकर यांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी लिफ्टचे दरवाजे तोडले. सुमारे 5 ते 7 मिनिटांच्या प्रयत्नानंतर त्यांची सुटका झाली. त्या क्षणी ते घामाघूम झालेले होते. त्यांनी थोडं पाणी प्यायलं आणि नंतर तीन मजले पायदळ चढून कार्यक्रमस्थळी पोहोचले.
या संपूर्ण घटनेमुळे उपस्थितांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, कुठलीही शारीरिक इजा न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. प्रवीण दरेकर यांच्याकडून या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.