
देगलूर: “भारत माता की जय!”, “शहीद सचिन वनंजे अमर रहें!” अशा राष्ट्रभक्तीने भरलेल्या घोषणांनी आज देगलूरच्या आसमंताला स्फूर्ती दिली, तर डोळ्यांतून अश्रूंचा ओघ धरला. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना अपघातात शहीद झालेले देगलूरचे सुपुत्र, 29 वर्षीय जवान सचिन वनंजे यांच्यावर आज शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता नगरपरिषद शेजारील मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिनांक 6 मे रोजी, सचिन वनंजे हे आपल्या सहकाऱ्यांसह नियोजित पोस्टकडे जात असताना त्यांचं सैनिकी वाहन खोल दरीत कोसळलं. त्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे 4 वाजता हैदराबादहून देगलूरला पोहोचले.
सकाळी 8:30 वाजता फुलांनी सजवलेल्या सैनिकी वाहनातून सचिन यांची अंत्ययात्रा निघाली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अण्णाभाऊ साठे चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संत रविदास चौक आदी प्रमुख मार्गांवरून ही अंत्ययात्रा जनसागराच्या साक्षीने नगरपरिषदेच्या शेजारी पोहोचली. येथे सैन्यदलाकडून हवेत गोळीबार करत शौर्य मानवंदना देण्यात आली. बौद्ध परंपरेनुसार भंते रेवतबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यविधी पार पडला.
या अंत्यविधीस खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार जितेश अंतापुरकर, तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शहीद जवानाच्या कुटुंबीयांसाठी जनसागराने सामूहिक अश्रू वाहिले.
सचिन वनंजे यांनी 2017 मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला. पहिली नियुक्ती थेट सियाचीनमध्ये झाली. त्यानंतर जालंधर आणि शेवटी श्रीनगरमध्ये सेवा बजावत असतानाच त्यांचं शौर्यपूर्ण आयुष्य संपलं. मार्चमध्ये ते सुट्टीवर आले होते आणि एप्रिलमध्ये परत ड्युटीवर रुजू झाले होते.
त्यांचे 2022 मध्ये लग्न झाले होते आणि त्यांच्या मागे केवळ 8 महिन्यांची चिमुकली मुलगी आहे. आई गृहिणी, वडील खाजगी वाहनचालक या साध्या कुटुंबातून आलेल्या सचिन यांनी देशसेवेसाठी आपले सर्वस्व दिले.